क्वाललंपूर : पुढारी ऑनलाईन
भारताने वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्याचा दावा मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी फेटाळून लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असताना मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांची भेट घेतली होती. नरेंद्र मोदी आणि महाथिर मोहम्मद यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली होती. यावेळी मोदींनी भारतातून फरार होऊन मलेशियात आश्रय घेतलेल्या झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावर चर्चा केली असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली होती. मात्र महाथिर मोहम्मद यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "अनेक देशांना झाकीर नाईक आपल्याकडे नको आहे. मी नरेंद्र मोदींना भेटलो, त्यांनी माझ्याकडे त्याचं प्रत्यार्पण करण्याची कोणतीही मागणी केलेली नाही.".
महाथिर मोहम्मद यांच्या या वक्तव्यामुळे भारताचा दावा फोल ठरला आहे. नरेंद्र मोदी आणि महथिर मोहम्मद यांच्या बैठकीसंबंधी विचारलं असता विजय गोखले यांनी सांगितलं होतं की, "दोन्ही देशातील अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहतील असा निर्णय झाला आहे".
झाकीर नाईक हा फरार असून त्याच्याविरोधात दहशतवादाशी संबंधित गंभीर आरोप आहेत. झाकीर नाईक वादग्रस्त 'पीस टीव्ही'चा संस्थापक असून २०१७ पासून तो मलेशियात वास्तव्य करत आहे. सध्याच्या मलेशियन सरकारने झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याच्या सार्वजनिक भाषणांवर बंदी आणली आहे.