वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘क्वाड’ देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या चौथ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेला दाखल झाले.यावेळी अमेरिकेतील भारतीयांनी मोदी यांचे भव्य स्वागत केले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. बायडेन यांनीही मोेदी यांचे शाही स्वागत केले. दोन्ही देशातील संबंधांना नवा आयाम देण्याबाबत यावेळी महत्वपूर्ण चर्चा झाली. अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबतही मोदी द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत.
क्वाड संघटनेत अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांचा समावेश आहे. क्वाड परिषदेमध्ये इंडो-पॅसिफिक देशांमध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्याबाबत निर्धार करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी परिषदेला जाण्याआधी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. तीन दिवसांचा हा दौरा असून, 21 सप्टेंबर रोजी चौथ्या क्वाड शिखर परिषदेत ते सहभागी होतील. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेच्या एका कार्यक्रमालाही ते संबोधित करणार आहेत. भारत पुढील वर्षी क्वाड देशांच्या (चतुर्भुज) राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे.
क्वाड देशांची बैठक विल्मिंग्टन, डेलावेअर येथे होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सहभागी होणार आहेत. बैठकीत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये रशिया-युक्रेन युद्धापासून इस्रायल-हमास संघर्षापर्यंत विविध गोष्टींवर चर्चा होईल.