

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगीच्या घटनेमुळे लंडनचा हिथ्रो विमानतळ (Heathrow Airport) शुक्रवारी किमान २४ तास बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. वीज उपकेंद्राला लागलेल्या आगीमुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे. तसेच विमानतळावर ये-जा करणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
गुरुवारी रात्री ११.३० वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ५ वाजता) आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले. शुक्रवारी पहाटे २ वाजता (सकाळी ७:३० वाजता) विमानतळ बंद केल्याचे जाहीर करण्यात आले.
"विमानतळाला वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनला आग लागली. यामुळे हिथ्रो विमानतळावरील वीजपुरवठा खंडित होत आहे. प्रवाशी आणि सहकाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता हिथ्रो विमानतळ २१ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत बंद राहील. प्रवाशांनी विमानतळावर प्रवास करुन येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी त्यांनी त्यांच्या एअरलाइनशी संपर्क साधावा. याबद्दल झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो," असे हिथ्रो विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हिथ्रो हा युरोपमधील सर्वात व्यस्त असलेला विमानतळ आहे. हा कधीपासून पुन्हा सुरू होईल? याबद्दल काही सांगू शकत नाही, असे प्रवक्त्याने सांगितले. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटरडारच्या माहितीनुसार, विमानतळ बंद झाल्यामुळे हिथ्रोला जाणाऱ्या किमान १२० विमानांचा मार्ग बदलावा लागणार आहे.
दरम्यान, हिथ्रोपासून सुमारे ३ किलोमीटर उत्तरेस असलेल्या ठिकाणी आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर १० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, येथील भीषण आगीमुळे पश्चिम लंडनमधील हजारो घरांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे.