पुढारी ऑनलाईन डेस्क
बेरूत उपनगर आणि लेबनॉनचा इतर भाग कम्युनिकेशन पेजरच्या स्फोटाने हादरला. या स्फोटात लेबनीजचा सशस्त्र गट हिजबुल्लाहच्या सदस्यांसह किमान ८ लोक ठार झाले. तर २,७५० जण जखमी झाले, अशी माहिती देशाचे आरोग्य मंत्री फिरास अबियाद यांनी सांगितले. या हल्ल्यात हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे सदस्य, इराणचे राजदूत आणि इतर पदाधिकारीही जखमी झाले. लेबनॉन सीमेवरील वाढता तणाव पाहता हिजबुल्लाहने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. (Lebanon Pager Explosion )
लेबनॉन आणि इस्रायलमध्ये तणाव वाढत असताना ही घटना घडली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर 11 महिन्यांहून अधिक काळ लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. या संघर्षात लेबनॉनमध्ये शेकडो आणि इस्रायलमध्ये डझनभर लोक मारले गेले आहेत आणि सीमेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोक बेघर झाले आहेत.
लिथियम बॅटरी जास्त गरम झाल्यानंतर त्यामधून धूर येण्यास सुरुवात होते. तसेच त्या बॅटरी वितळू शकते आणि आगदेखील पकडू शकते. रिचार्ज करण्यायोग्य लिथियम बॅटरी सेलफोन आणि लॅपटॉपपासून इलेक्ट्रिक कारपर्यंतच्या ग्राहक उत्पादनांमध्ये वापरल्या जातात. लिथियम बॅटरीमधील आग 590 °C (1,100 °F) पर्यंत तापमान निर्माण करू शकते.