

सहरसा; वृत्तसंस्था : अज्ञात हल्लेखोराने पाकिस्तानात आपल्या सुमारे ३० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची कबुली पाकिस्तानच्या भूमीवर सक्रिय असलेल्या 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेने पहिल्यांदाच दिली आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित रिझवान हनीफ या दहशतवाद्याच्या ‘कबुलीनामा’चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर पाकिस्तानात खळबळ पसरली आहे.
रिझवान हनीफ नावाच्या या दहशतवाद्याचा हा व्हिडीओ असून, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या व्हिडीओच्या सत्यतेला दुजोरा दिला आहे. हा व्हिडीओ खरा असून यात दिसणारा व्यक्ती लश्करचा मोठा दहशतवादी आणि भारताचा वॉन्टेड गुन्हेगार आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) वेगवेगळ्या भागांत आमच्या संघटनेतील अनेक लोक मारले गेले. पेशावर, कराची, रावळपिंडी, रावलाकोट आणि मुझफ्फराबाद येथे लष्कर-ए-तोयबाच्या ३० हून अधिक सदस्यांचा अज्ञात हल्लेखोरांच्या हातून खात्मा झाला, असा दावा हनीफने या व्हिडीओमध्ये केला आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित एका दहशतवाद्याने या दहशतवादी संघटनेच्या इतक्या मोठ्या नुकसानाची सार्वजनिकपणे कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे, हे विशेष.
धार्मिक आधारावर द्वेष पसरवण्याचा कट
व्हायरल व्हिडीओत हनीफ असा आरोप करत आहे की, भारतीय यंत्रणांनी या 'टार्गेट किलिंग्स' (लक्ष्य करून हत्या) घडवून आणल्या आहेत. तथापि, भारताने नेहमीच या आरोपांचे खंडन केले आहे. दरम्यान, या व्हिडीओत रिझवान हनीफ हिंदू धर्माविरोधातही आक्षेपार्ह आणि द्वेषयुक्त भाषेचा वापर करताना ऐकू येते. यावरून दहशतवादी संघटना धार्मिक भावनांचा वापर करून द्वेष पसरवण्याचा आणि लोकांना कट्टरवादाकडे ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते.
पीओकेतील सद्यस्थिती
सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्येही (पीओके) परिस्थिती तणावपूर्ण आहे. तीव्र निदर्शनांमुळे तेथील शाहबाज शरीफ सरकार दबावाखाली आहे. पीओकेमधील मुझफ्फराबाद, मीरपूर आणि इतर भागांत महागाई, वीज कपात आणि सरकारी दडपशाहीविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या घोषणाही तेथे चर्चेचा विषय बनल्या आहेत.