

वॉशिंग्टन डी.सी.; वृत्तसंस्था : ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय सध्या अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत स्टेट डिनरमध्ये सहभाग घेतला. या औपचारिक कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी हलक्या-फुलक्या शैलीत एकमेकांवर विनोदात्मक टिपण्णी केली. इंग्रजी भाषेवरून चार्ल्स म्हणाले की, आम्ही नसतो तर अमेरिका फ्रेंच बोलली असती. त्यामुळे कार्यक्रमात हशा पिकला.
जानेवारीत दावोस परिषदेत ट्रम्प म्हणाले होते की, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने हस्तक्षेप केला नसता तर युरोप आज जर्मन किंवा जपानी प्रभावाखाली असता. त्यांच्या या विधानावर चार्ल्स यांनी विनोदी पद्धतीने प्रत्युत्तर दिले. चार्ल्स म्हटले की, “तुम्ही म्हणाला होता की अमेरिका नसती तर युरोपियन लोक जर्मन बोलत असते. पण मी एवढंच म्हणेन की आम्ही ब्रिटिश नसतो तर आज अमेरिकन लोक फ्रेंच बोलत असते.” हा टोला १८व्या शतकातील ब्रिटन आणि फ्रान्समधील उत्तर अमेरिकेवरील वर्चस्वाच्या संघर्षाशी संबंधित होता, ज्यात अखेरीस ब्रिटनचा विजय झाला.
चार्ल्स यांनी ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करत वातावरण हलकेफुलके केले. १८१४ मध्ये ब्रिटिश सैन्याने व्हाइट हाऊस जाळल्याची घटना आठवून त्यांनी हसत म्हटले की, “आम्हीही येथे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला होता.” तर बोस्टन टी पार्टीचा संदर्भ देत ते म्हणाले की, आजचा डिनर त्या घटनेपेक्षा खूपच चांगला आहे. बोस्टन टी पार्टीमध्ये अमेरिकन कामगारांनी चहाची खोकी समुद्रात फेकली होती.
ट्रम्प यांनी चार्ल्स यांच्या भाषणाचे कौतुक करत विनोदाने म्हटले की, “चार्ल्स यांनी डेमोक्रॅट्सनाही उभं करून टाळ्या वाजवायला लावलं, जे मी कधी करू शकलो नाही.” दरम्यान, चार्ल्स यांनी ट्रम्प यांना दुसऱ्या महायुद्धातील एचएमएस पाणबुडीची घंटा भेट दिली. त्यांनी सांगितले की ही भेट दोन्ही देशांच्या ऐतिहासिक नात्याचे प्रतीक आहे.