

Kim Jong Un उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची किशोरवयीन मुलगी एक लष्करी रणगाडा चालवताना दिसली असून त्याच टँकवर किम जोंग उन बसलेले दिसत आहेत. उत्तर कोरीयाच्या सरकारी चॅनेलने हा व्हिडीओ प्रसारीत केला आहे. उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था 'केसीएनए'ने (KCNA) शुक्रवारी या संदर्भातील छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या घटनेमुळे किम यांची मुलगी त्यांची भावी वारसदार म्हणून प्रशिक्षण घेत असावी, असे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत.
याबाबत रॉयटर या वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे. तर उत्तर कोरीयात अशा प्रकारे वादग्रस्त युद्ध सराव होत असतात. त्यामुळे जगात चिंतेचे वातारणही आहे. कारण किम जो उन हे कधीही कोणतेही पाऊल उचलू शकतात. अनेक देश विषेशता अमेरिका उत्तर कोरीयाच्या या युद्ध सरावांबाबत कायम आक्षेप घेत असते.
मुलगीला करणार वारसदार
प्रसिद्ध झालेल्या ताज्या छायाचित्रांमध्ये किम यांची मुलगी रणगाड्याच्या ड्रायव्हरच्या जागेतून अत्यंत एकाग्रतेने बाहेर पाहताना दिसत आहे. यावेळी तिचे वडील किम जोंग उन रणगाड्याच्या वरच्या भागाला टेकून बसले आहेत व हसताना दिसत आहेत, तर त्यांच्यासोबत लष्करी गणवेशातील तीन अधिकारीही बसलेले पाहायला मिळत आहेत. किम यांची ही मुलगी 'जु-ए' नावाने ओळखली जाते आणि तिचे वय साधारण १३ वर्षे असल्याचे मानले जाते. गेल्या काही महिन्यांपासून ती वारंवार आपल्या वडिलांसोबत सार्वजनिक आणि लष्करी कार्यक्रमांमध्ये दिसत आहे. यामुळे तिच किम यांची वारसदार असू शकते असे अनेक विष्लेशकांना वाटते.
शस्त्रसाठ्याची पाहणी
या महिन्याच्या सुरुवातीला ती एका शूटिंग रेंजवर रायफलने निशाणा साधताना आणि हँडगनने गोळीबार करताना देखील दिसली होती. दरम्यान, उत्तर कोरियाने अद्याप तिच्या नावाबाबत किंवा वयाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. किम जोंग उन यांनी गुरुवारी एका नवीन प्रकारच्या रणगाड्याच्या सरावाचे निरीक्षण केले. हा नवीन रणगाडा ड्रोन आणि अँटी-टँक क्षेपणास्त्रांविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम असल्याचा दावा केसीएनएच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.