पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे हिब्रू भाषेतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट काही तासांतच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा करत X ने ही कारवाई केली आहे. दरम्यान, खामेनी यांचे X अकाऊंट पूर्वीप्रमाणेच सुरु आहे. (Israel-Iran War)
इस्रायलने शनिवारी इराणवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर खामेनी यांनी शनिवारी रात्री उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) हिब्रू भाषेत आपले खाते सुरू केले. काही तासांतच हे अकाऊंट स्थगित करण्यात आले आहे.(Israel-Iran War)
इराणवर हल्ला करून ज्यू राजवटीने दोन रात्री मोठी चूक केली असून, आता , इस्रायलला इराणी लोकांचे सामर्थ्य, दृढनिश्चयाची शक्ती समजावून सांगावी लागेल, अशा शब्दांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलला धमकी दिली होती. खामेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'ज्यू राजवटीने दोन रात्री चुकीचे पाऊल उचलले. त्यांना इराण माहीत नाही आपल्याला इराणी लोकांचा दृढनिश्चय, पुढाकार आणि सामर्थ्य दाखवावे लागेल. आमच्या अधिकाऱ्यांनी इराणी लोकांची शक्ती शत्रूला दाखवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे अचूकपणे समजून घेणे आणि या देशाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी जे काही आहे ते करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते.
इराणने शनिवारी आपल्या लष्करी तळांना लक्ष्य करून इस्त्रायली हवाई हल्ल्यात दोन सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. इस्रायलने एकाच वेळी क्षेपणास्त्र सुविधा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि इतर हवाई क्षमतांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात मर्यादित नुकसान झाल्याचे इराणने म्हटले आहे.तर इराणच्या 1 ऑक्टोबरच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला या हवाई हल्ल्याने प्रत्युत्तर दिल्याचे इस्रायलने म्हटले आहे. हल्ला केल्यानंतर त्याची युद्धविमान सुरक्षितपणे परतली असून मोहीम पूर्ण झाली आहे. आता जगाच्या नजरा इराणच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.