पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या गोळीबार प्रकरणी भारतातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार, खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग ऊर्फ अर्श डल्ला याला कॅनडा पोलिसांनी अटक केली आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांनीही या माहितीची पुष्टी केली आहे. दरम्यान, कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या काही दिवसांनंतर दहशतवादी डल्ला याला अटक करण्यात आली आहे. 3 नोव्हेंबर रोजी ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला होता. हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.
२७ आणि २८ ऑक्टोबर रोजी कॅनडामधील मिल्टन शहरात गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी अर्शदीप सिंग उर्फ अर्श डल्ला याचे नाव समोर आले होते. तो भारतातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारापैकी एक आहे. तो आपल्या पत्नीसह कॅनडात वास्तव्यास आहे. आता गोळीबार प्रकरणी त्याला अटक झाल्यानंतर भारतीय अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि अधिक तपशिलांसाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत.
अर्श डल्ला हा कॅनडामधील खलिस्तानी टायगर फोर्सचा म्होरक्या आहे. कॅनडात ठार झालेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्यानंतर डल्ला हाच खलिस्तानी दहशतवादी कारवाया घडवत होता. सप्टेंबर २०२३ मध्ये त्याने काँग्रेस नेते, बलजिंदर सिंग बल्ली यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. ज्याची पंजाबच्या मोगा जिल्ह्यात त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या झाली होती. यानंतर बलजिंदर सिंग बल्लीने आपले भविष्य उद्ध्वस्त केले. त्याने मला दहशतवादाच्या दुनियेत आणले, असा दावा डल्लाने आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये केला होता. आपल्या आईच्या पोलीस कोठडीमागे काँग्रेस नेत्याचा हात होता, ज्याने त्याला बदला घेण्यास प्रवृत्त केले, असा दावाही त्याने केला होता.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) दहशतवादी यादीत असलेला अर्श डल्ला हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून कॅनडातील त्याच्या तळावरून पंजाबमध्ये गुन्हेगारी कारवाया घडवून आणत आहे. मूळचा मोगाचा रहिवासी असलेल्या डल्लावर पंजाबमध्ये अनेक टार्गेट किलिंगचे आरोप आहे. पंजाब पोलिसांनी त्याच्या जवळच्या सहाय्यकांना अटक करून आणि आयईडी, हँड-ग्रेनेड आणि इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करून डल्लाच्या पाठीशी असलेल्या अनेक मॉड्यूल्सचा आधीच पर्दाफाश केला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हत्यामागे भारतीय एजंट असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध कमालीचे ताणले केले आहेत. कॅनडाचा आरोप बिनबुडाचा आणि निराधार असल्याचे यापूर्वीच भारताने स्पष्ट केले आहे.