

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-जॉर्डन सीमेवर झालेल्या गोळीबार भारतीय नागरिक ठार झाला आहे. थॉमस गॅब्रिएल पेरेरा (४७) असे त्यांचे नाव असून, ते केरळमधील थुंबा येथील रहिवासी होते. त्यांच्या नातेवाईकाला या घटनेची माहिती देण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.
जॉर्डनमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, 'दुर्दैवी परिस्थितीत एका भारतीय नागरिकाच्या दुःखद मृत्यूबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि या प्रकरणावर कारवाई करत आहोत. १ मार्च रोजी भारतीय दूतावासाकडून गॅब्रिएल यांच्या मृत्यूची पुष्टी करणारा ईमेल जॉर्डनमधील भारतीय दूतावासाकडून मिळाला होता; पण त्यानंतर कोणतीही माहिती मिळाली नाही," असे थॉमस गॅब्रिएल पेरेराच्या नातेवाईकांनी 'पीटीआय'शी बोलताना सांगितले. गोळीबाराची घटना १० फेब्रुवारी रोजी घडली. जॉर्डनच्या सैनिकांनी सीमेवर गोळीबार केला. यावेळी गॅब्रिएल यांच्यासोबत त्याचा नातेवाईक एडिसन होता. त्याच्या पायाला गोळी लागली. तो जखमी अवस्थेत घरी परतला.
एका रिपोर्ट्सनुसार, गॅब्रिएल आणि एडिसन हे एका एजंटच्या मदतीने जॉर्डनहून इस्रायलची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार सदस्यांच्या गटाचा भाग होते. हे चौघेही तीन महिन्यांच्या पर्यटन व्हिसावर जॉर्डनला पोहोचले होते.ते सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा जॉर्डनच्या सैन्याने त्यांना रोखले; परंतु जेव्हा ते पळून जाऊ लागले तेव्हा सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गॅब्रिएलच्या डोक्यात गोळी लागल्याचे वृत्त आहे, तर एडिसन जखमी झाला. उपचारानंतर एडिसनला भारतात परत पाठवण्यात आले आहे.