

Tomomi Nishikubo: थरारक स्टंट करण्यात काही लोक खूप माहीर असतात, आता असाच एक स्टंट जपानच्या स्टंट सायकलिस्टने केला आहे. त्यांने एका चाकावर उलटी सायकल चालवून आपल्या नावावर दोन जागतिक विक्रम केले आहेत. याची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. या सायकलपटूचे नाव आहे टोमोमी निशिकुबो (Tomomi Nishikubo). टोमोमीने ऑलिम्पिक स्कि-जंपिंग ट्रॅकवरून केवळ एका चाकावर उलटी सायकल चालवत हे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
उलटी सायकल तीही तीव्र उतारावरुन चालवली
या सायकलपटूनला ट्रायल्स सायकलिस्ट म्हटले जाते. यामध्ये जपानच्या टोमोमी निशिकुबो (Tomomi Nishikubo) याचे नाव जगप्रसिद्ध आहे. टोमोमी याने अतिशय धोकादायक आणि अशक्य वाटणारा स्टंट यशस्वीरीत्या पूर्ण करून इतिहास रचला आहे. त्याने फक्त पुढच्या चाकावर संतुलन राखत, उलटी सायकल चालवली आहे. जपानमधील नागानो येथील ऐतिहासिक हकुबा ऑलिम्पिक स्की जंप स्टेडियमवर त्याने हा स्टंट पार पाडला.
फॅकी नोज मॅन्युअल
सायकलिंगच्या भाषेत या स्टंटला 'फॅकी नोज मॅन्युअल' (Fakie Nose Manual) असे म्हटले जाते. यामध्ये सायकलचे मागचे चाक हवेत उचलून, केवळ पुढच्या चाकावर तोल सांभाळत उलटे जावे लागते. टोमोमीने हा कारनामा नेहमीच्या सपाट रस्त्यावर न करता ऑलिम्पिकच्या ३७.५ अंश तीव्र उतारावर करून आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले.
बॅलन्स साधत पार केले ४४८ फूट अंतर
सर्वात तीव्र उतारावर उलटी सायकल चालवणे : ३७.५ अंशाच्या तीव्र उतार व सर्वाधिक ४४८ फूट अंतर अशा उलट्या बाजूने तेही एका चाकावर असे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टोमोमीने केले आहेत. यासाठी त्याला ३५ सेकंद सायकलचा तोल सांभाळावा लागला. या प्रकारच्या स्टंटमध्ये अशी कामगिरी कोणालाच करता आली नव्हती.
५० वेळा अपयश: दोन वर्षे प्रयत्न
टोमोमीसाठी हा विक्रम सोपा नव्हता . या विक्रमाच्या प्रवासात त्याने तब्बल ५० वेळा प्रयत्न केले, ज्यात अनेक धोकादायक अपघात देखील झाले. तसेच हा स्टंट पूर्ण करताना टोमोमीच्या सायकलचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचला होता. अत्यंत वेगाने खाली येताना, उभा उतार आणि पाठीमागची बाजू काहीही दिसत नसताना त्याने सलग ३५ सेकंद सायकलचा तोल सांभाळला. तीव्र उतारावर सायकलचे ब्रेक अति गरम होऊन निकामी होत होते. यासाठी त्याने ११ प्रकारच्या ब्रेक सिस्टीम्स आणि ६ वेगवेगळ्या टायर्सचे प्रयोग केले. अखेर सर्व तांत्रिक अडचणींवर मात करत त्याने यश मिळवले.