पुढारी ऑनलाईन डेस्क : चीन आणि तैवान यांच्यातील समुद्रधुनीतून जपानची युद्धनौका मार्गक्रमण करत आहे. ही युद्धनौका दक्षिण चीन समुद्रातील युद्धसरावात भाग घेणार आहे. या युद्धसरावात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडचे नौदल भाग घेत आहे.
चीनने सातत्याने तैवानवर आणि दोन्ही देशातील समुद्रधुनीवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे जपानने आजपर्यंत या समुद्रधुनीत कधी युद्धनौका पाठवली नव्हती. त्यामुळे जपानच्या या कृतीला मोठे महत्त्व आलेले आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने ही बातमी दिलेली आहे. "चीनचे लष्कर या नौदलाच्या मार्गावर लक्ष ठेऊन आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे," असे बातमीत म्हटले आहे. चीनने जपानच्या हवाईहद्दीचे वारंवार उल्लंघन केल्याने जपानने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. तैवानची समुद्रधुनी सर्व देशांच्या जहाजांसाठी खुली असल्याचा दावा अमेरिका आणि तैवानचा आहे. तर चीन या सामुद्रधुनीला स्वतःचा सार्वभौम हिस्सा मानते.
या समुद्रधुनीतून आतापर्यंत फक्त अमेरिकेचे नौदल मार्गक्रमण करत होते. पण गेल्या काही दिवसांत कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स या देशांच्या नौदलांच्या जहाजांनी या सामुद्रधुनीतून मार्गक्रमण केले आहे. तर काही दिवसांपूर्वी जर्मनीची युद्धनौकाही येथे होती, यावरून जर्मनी आणि चीन यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता.