

म्युनिच ः वृत्तसंस्था
लोकशाहीच्या मुद्द्यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चात्त्य देशांचे वाभाडे काढले. येथील सुरक्षा परिषदेत बोलताना जयशंकर यांनी पाश्चात्त्य देशातील हुकूमशाही वृत्तीवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, बिगर पाश्चात्त्य देशांमध्ये लोकशाही आणि लोकशाहींच्या मूल्यांचे पालन केले जात आहे. पाश्चात्त्य देशांत मात्र देखाव्यापुरतीच लोकशाही अस्तित्वात आहे. पाश्चात्त्य देशांनी भारतासह बिगर पाश्चात्त्य देशांचा आदर्श घेण्याची गरज आहे. पाश्चात्त्य देश हे बिगर लोकशाही शक्तींना पाठीशी घालत आहेत.
पाश्चात्त्य देश घरी लोकशाहीचा आदर करतात आणि जागतिक पातळीवर मात्र लोकशाहीच्या विरोधकांना फूस लावतात. त्यामुळे पाश्चात्त्य देशांनी द़ृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. भारतात स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा पुरस्कार करण्यात आला. भारतात बहुविविधता असल्याने आमच्या देशात लोकशाहीची मूल्ये खोलवर रुजल्याचेही त्यांनी सांगितले.
म्युनिच येथील सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिकेन सिनेटरसह अन्य देशांतील नेत्यांनी सहभाग घेतला. लोकशाही टेबलवर भोजन पुरवित नसल्याचे वक्तव्य अमेरिकन सिनेटरने केल्याने जयशंकर यांनी बोटावरील मतदानाची शाई दाखवत भारतातील मूर्तिमंत लोकशाहीचे जोरदार समर्थन केले.