Jaish-e-Mohammed | १ जानेवारीपासून 'दहशतवादाचे' ट्रेनिंग! जैश-ए-मोहम्मदकडून बालकांच्या भरतीचा नवा 'प्लॅन'
इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद पुढील वर्षी 1 जानेवारीपासून पाकव्याप्त काश्मीरमधील मिरपूर येथे सात दिवसांचे तरबिया म्हणजेच प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी रविवारी दिली. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरने स्थापन केलेली ही संघटना पाठिंबा मिळवण्यासाठी गढी हबीबुल्लाह आणि बालाकोटमध्ये सार्वजनिक रॅलींचेही आयोजन करत आहे.
या रॅलींमध्ये लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी होत असून, त्यानंतर त्यांची दहशतवादी संघटनेत भरती केली जात आहे. याशिवाय लष्कर-ए-तैयबानेदेखील पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपली महिला शाखा सक्रिय केली असून भरतीसाठी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांना लष्करचे अब्दुल रौफ, रिझवान हनीफ आणि अबू मुसा उपस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले. एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जे दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले होते, त्यांची पुनर्बांधणी या संघटनांकडून केली जात आहे.
लष्कर-ए-तैयबा या संघटनेने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील लोअर दिर जिल्ह्यात जिहाद-ए-अक्सा नावाचे दहशतवादी शिबिर सक्रिय केले आहे. जैश-ए-मोहम्मदने आत्मघातकी हल्ल्यांसाठी महिलांची भरती सुरू केली असून, यासाठी रावलकोटमध्ये दुख्तरान-ए-इस्लाम नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. आयसिस आणि हमासप्रमाणे महिला ब्रिगेड तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
ऑनलाईन प्रशिक्षण
जैशने तुफत अल-मुमिनात नावाचा ऑनलाईन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला असून याद्वारे महिलांची भरती केली जात आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. या कोर्समध्ये मसूद अझहरच्या बहिणी सादिया अझहर आणि समायरा अझहर दररोज 40 मिनिटांचे वर्ग घेत आहेत.
भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क
या घडामोडींमुळे भारतीय सुरक्षा दले सतर्क झाली असून, भारताला लक्ष्य करण्याचे त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश आणि लष्करच्या सर्व हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

