

तेल अवीव; वृत्तसंस्था : 9 ऑक्टोबरपासून लागू असलेल्या युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलने केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला ठरला आहे. या हल्ल्यात कमीतकमी 104 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून, यात 46 बालकांचा समावेश आहे. तसेच हल्ल्यात 253 जण जखमी झाले आहेत.
इस्रायलने हल्ल्यापूर्वी असा दावा केला होता की, हमासने युद्धविरामाचा भंग करून गाझामध्ये तैनात इस्रायली सैनिकांवर हल्ला केला, त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. मात्र, हमासने या आरोपांचे खंडन केले असून, ते युद्धविरामाचे पालन करत असल्याचे सांगितले आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा सिटी, खान यूनिस, बेत लहिया आणि अल-बुरैजसारख्या घनवस्ती असलेल्या भागांना लक्ष्य केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली हल्ल्याचे समर्थन केले. ते म्हणाले की, सैनिकाची हत्या झाल्यानंतर इस्रायलने केलेली ही प्रत्युत्तरातील कारवाई आहे आणि यामुळे युद्धविराम धोक्यात नाही. तसेच त्यांनी हमासला संयम बाळगण्याचे आवाहन केले.
मानवीय मदतीवर परिणाम
इस्रायल गाझामध्ये मानवीय मदत रोखण्याचा विचार करीत आहे. तसेच इस्रायली सैन्याने वेस्ट बँकच्या जेनिन परिसरात छापा मारून तीन पॅलेस्टिनींना ठार केले.
ट्रम्प यांची शांती योजना
डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 सप्टेंबर 2025 रोजी गाझा संघर्ष थांबवण्यासाठी 20 सूत्रांची शांती योजना मांडली होती, ज्यात हमासचे निशस्त्रीकरण मुख्य अटींपैकी होते. त्यानंतर 13 ऑक्टोबरला इजिप्तच्या शर्म अल शेख शहरात शांती करारावर स्वाक्षरी झाली. तिथे 20 हून अधिक देशांचे नेते उपस्थित होते. तथापि इस्रायल आणि हमासला समाविष्ट केले गेले नाही.
हमासचे आरोप
हमासने या हल्ल्याला नागरिकांवर थेट हल्ला म्हटले असून, युद्धविराम तोडण्याचा प्रयत्न इस्रायल करत असल्याचा आरोप केला आहे. खान यूनिसमध्ये एका गाडीवर हल्ला केल्यामुळे 5 जण ठार झाले, त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.
संघर्षाची पार्श्वभूमी
सोमवारी रात्री हमासने एका इस्रायली बंधकाचा मृतदेह ताबूतातून परत केला, जो आधीपासून इस्रायली लष्कराने डिसेंबर 2023 मध्ये शोधला होता. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सार्वजनिक झाला, ज्यात हमासकडून मृतदेहाला छुप्या पद्धतीने दफन करण्याचा प्रकार दिसून आला. यामुळे इस्रायली जनतेत मोठा रोष निर्माण झाला. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तातडीच्या बैठकीत हमासवर हल्ल्याचा आदेश दिला. इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज यांनी हमासवर मृत बंधकांच्या शवांचे हक्क न दिल्याचा आरोप करत म्हटले की, युद्धविरामाचा भंग केल्यास मोठा परिणाम भोगावा लागेल.