पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायली सैन्याने रविवारी (दि. २२ सप्टेंबर) लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यातील मृतांची संख्या ४९२ वर पोहचली आहे. मृतांमध्ये ३५ मुलांसह ५८ महिलांचा समावेश आहे. १६०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये 100 हून अधिक रॉकेट डागले. इस्रायलच्या हैफा शहराजवळ रॉकेट पडले. या हल्ल्यात चार जण जखमी झाले. रॉकेट हल्ल्यानंतर हिजबुल्लाहचा उपनेता नईम कासिमने खुल्या युद्धाची घोषणा केली होती. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने रविवारी लेबनॉनमधील बिंट जबेल, अतारोन, मजदल सालेम, हौला, तोरा, कालालेह, हरिस, नबी चित, तरैया, श्मेस्टार, हरबता, लिब्बाया आणि सोहमोर आदी शहरांवर हवाई हल्ले केले. दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाह एअरबेस आणि लष्करी उत्पादन तळांवर हल्ला केल्याचा दावा इस्त्रायलने केला होता.
इस्रायली लष्कराने म्हटले हाेते की, हिजबुल्लाहने 20 सप्टेंबर रोजी उत्तर इस्रायलवर मोठा हल्ला केला. लेबनॉनमधून एका रात्रीत 150 हून अधिक रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. संतप्त झालेल्या इस्रायली सैन्याने पलटवार करत हिजबुल्लाचा टॉप कमांडर इब्राहिम अकीलला ठार केले. इब्राहिम अकील हा हिजबुल्लाहचा दुसरा-इन-कमांड होता.
इस्रायलने हमाससोबत गाझामधील युद्धानंतर उत्तर सीमेवर आघाडी उघडली आहे. हिजबुल्लाहच्या हल्ल्यामुळे उत्तर इस्रायलच्या सीमावर्ती भागातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. उत्तर सीमेवरील हिजबुल्लाविरुद्धची कारवाई सुरूच राहील, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी म्हटले आहे.