पुढारी ऑनलाईन डेस्क : "माझ्या आणि संरक्षण मंत्री यांच्यातील विश्वासाला तडा गेला आहे," असे कारण देत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांना पदावरून हटवले आहे. मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी त्यांनी या कारवाईची घोषणा केल्यावे वृत्त 'द इस्त्रायल टाइम्स'ने दिले आहे. ( Israel-Gaza War News )
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सध्या सुरू असलेल्या गाझा युद्धादरम्यान गेल्या काही महिन्यांपासून योव गॅलंट यांनी राबवलेल्या कारवाईवरील विश्वास उडाला आहे. यामुळे त्यांच्या कार्यकाळ संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्री कॅट्झ यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात येईल. तर गिडॉन सार हे नवे परराष्ट्र मंत्री असतील.
नेतन्याहू आणि योव गॅलंट यांच्या लष्करी कारवाईवरुन संघर्ष झाला. नेतान्याहू यांनी गॅलेंट यांच्यावर कारवाई टाळली होती. कारण मार्च २०२३ मध्ये गॅलेंट यांच्यावर कारवाई केल्यानंतर नेतन्याहू यांच्याविरुद्ध इस्त्रायलमध्ये रस्त्यावरील तीव्र निदर्शने झाली होती. संरक्षण मंत्रालय सोडल्यानंतर गॅलंट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, इस्रायलच्या सुरक्षेला सुरक्षा नेहमीच त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असेल. इस्रायलची सुरक्षा हे माझ्या आयुष्याचे ध्येय होते आणि नेहमीच राहील.
इस्त्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री गॅलंट यांच्या मागील अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरु होता. विशेष म्हणजे अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गाझा आणि लेबनॉनमध्ये रक्तरंजित युद्धे सुरु असताना हा बदल करण्यात आला आहे.नेतान्याहू यांनी म्हटलं आहे की, मी आपल्यातील दुरावा कमी प्रयत्न केला; परंतु तो वाढतच राहिला. शत्रूंना त्याचा आनंद झाला. सरकारचे निर्णय आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयांचा विरोधाभास करतात. गॅलंट यांनी मध्यपूर्वेतील इस्रायलच्या युद्धाबाबत असहमती व्यक्त केली होती. गॅलंट म्हणाले होते की, युद्धाला स्पष्ट दिशा नाही, तर नेतान्याहू यांनी पुनरुच्चार केला की गाझामधील सत्ताधारी संस्था आणि लष्करी शक्ती म्हणून हमासचा उच्चाटन होईपर्यंत लढाई थांबू शकत नाही.
इस्रायलमधील राजकीय विश्लेषकांनी दीर्घ काळापासून असा अंदाज व्यक्त केला होता की, नेतान्याहू गॅलंट यांना काढूनत्यांच्या जागी राजकीय सहयोगी नियुक्त करतील. नेतन्याहू यांनी त्यांच्या उजव्या विचारसरणीच्या गव्हर्निंग युती आणि प्रतिस्पर्धी हितसंबंधांच्या गोंधळावर पडदा टाकण्यासाठी ही कारवाई केल्याचेही मानले जात आहे.
गॅलेंट यांना यापूर्वी पदावरुन हटविण्याचा प्रयत्न केला तेव्हा, यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. नेतान्याहू यांनी घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांनी इस्त्रायलींना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये निदर्शने झाली. जेरुसलेममधील नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तेल अवीवमध्ये, आंदोलकांनी मुख्य महामार्ग रोखला तर गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या कुटुंबांनी पंतप्रधानांचा निषेध केला.