

वॉशिंग्टन : मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीत इस्रायल आणि लेबनॉन यांनी सुरू असलेल्या युद्धविरामाला आणखी तीन आठवड्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणसोबतच्या संघर्षाचा शेवट सर्वोत्तम आणि कायमस्वरूपी कराराने व्हावा, यासाठी ते घाई करणार नाहीत.
इस्रायल आणि इराणपुरस्कृत हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष हा आठ आठवड्यांपासून सुरू असलेल्या व्यापक प्रादेशिक युद्धातील एक महत्त्वाचा अडथळा ठरला आहे. इराणचा अणुकार्यक्रम आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण यामुळेही तणाव अधिक वाढला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणचा दबदबा
युद्धविरामाची मुदतवाढ जाहीर होत असतानाच होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने दोन मोठ्या मालवाहू जहाजांवर ताबा मिळवला. या जहाजांवर 15 फिलिपिनो नागरिक असल्याची माहिती समोर आली असून ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
इराणने लहान, वेगवान नौकांच्या ताफ्याद्वारे कारवाई करत अमेरिकन नौदलाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ट्रम्प यांनी इराणच्या या नौकांना ‘लहान शहाण्या बोटी’ असे संबोधत त्यांचा धोका कमी लेखला. मात्र, तेल बाजारपेठेत या घडामोडींचा मोठा परिणाम दिसून आला असून कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.
ट्रम्प यांना प्रत्युत्तर
इराणचे सर्वोƒ नेते अयातुल्ला मोज्तबा खामेनी यांनी ‘इराणच्या नेतृत्वात गोंधळ आहे’ हा ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला. त्यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, शत्रूंच्या प्रचारामुळे इराणची एकता अधिक मजबूत होईल.
दक्षिण लेबनॉनमध्ये संघर्ष कायम
युद्धविराम असूनही दक्षिण लेबनॉनमध्ये हिंसाचार थांबलेला नाही. इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला. याआधी हिजबुल्लाहने इस्रायली सैन्यावर रॉकेट आणि ड्रोनद्वारे हल्ला केला होता. दरम्यान, इस्रायलने इराणवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी दर्शवली आहे. संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी अमेरिकेकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यास इराणला अंधकारमय युगात परत पाठवू, असा इशारा दिला.