

तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायलने पाकिस्तानसह ३१ देशांतील वैमानिक आणि केबिन क्रूच्या नियुक्तीवर निर्बंध लागू केल्याचे वृत्त आहे. इस्रायलशी राजनैतिक संबंध नसलेल्या देशांतील कर्मचाऱ्यांना इस्रायलला जाणाऱ्या विमानांवर काम करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा दावा वृत्तात केला आहे. पाकिस्तान, इराण, ओमान, सौदी अरेबिया आणि बांगला देश यांसारख्या देशांचा त्यात समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील बहुतांश देश मुस्लिमबहुल आहेत.
इस्रायलच्या ‘एन १२’ या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, देशाच्या परिवहन आणि रस्ते सुरक्षा मंत्रालयाने १ ऑक्टोबर रोजी परदेशी विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत. इस्रायलला जाणाऱ्या विमानांचे वैमानिक आणि केबिन क्रू हे इस्रायलशी राजनैतिक संबंध नसलेल्या देशांचे नागरिक किंवा अशा देशांचे दुहेरी नागरिकत्वधारक नसावेत, असे या निर्देशात म्हटले आहे. भारतीय वैमानिकावर झालेल्या कथित हल्ल्यानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची तपासणी अधिक कठोर केली आहे. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात ओमानचा सहवैमानिक हमाम अल-हमामी याने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करून विमानावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला होता. विमानाचे अपहरण करून ते इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर धडकवण्याचा हेतू होता, असा संयुक्त अरब अमिरातीने दावा केला आहे. हल्ल्यादरम्यान विमानाची उंची झपाट्याने कमी झाली होती. अखेरीस विमानाचे सौदी अरेबियातील तबुक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात १७४ प्रवासी आणि आठ कर्मचारी होते.
इस्रायलला प्रवेश नियंत्रित करण्याचा अधिकार असला तरी त्या नियमांचे पालन करणाऱ्या परदेशी विमान कंपन्यांना त्यांच्या देशातील रोजगारविषयक कायद्यांपासून आपोआप सूट मिळू शकत नाही. त्यामुळे एअर फ्रान्सला फ्रान्स सरकार, नागरी विमान वाहतूक प्राधिकरण किंवा युरोपीय संघामार्फत या निर्देशांना आव्हान देण्याचा पर्याय असू शकतो. प्रभावित कर्मचारी नुकसानभरपाई मागू शकतात, तर कर्मचारी संघटना न्यायालयीन कारवाई करू शकतात. या निर्बंधांचा आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर नेमका किती परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली लागू केलेले नियम आणि कर्मचाऱ्यांच्या समान वागणुकीचा अधिकार यांच्यातील संघर्षामुळे या प्रकरणाला कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, फ्रान्समधील एअरलाईन्स कंपनी एअर फ्रान्सने इस्रायलच्या नव्या निर्बंधांचे पालन करत असल्याचे स्पष्ट केले आहे. एअर फ्रान्सने म्हटले आहे की, विमान कंपनीला ती सेवा देत असलेल्या देशांचे प्रवेशविषयक नियम प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी पाळणे आवश्यक आहे. नव्या नियमांची संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे. तर झेक प्रजासत्ताकातील स्मार्टविंग्ज या विमान कंपनीने इस्रायलकडून निर्देश मिळाल्याची पुष्टी केली. मात्र, सध्या त्यांच्या विमानसेवेवर किंवा कर्मचारी नियोजनावर कोणताही परिणाम झालेला नाही. युनायटेड एअरलाईन्सने या विषयावर अधिक माहिती देण्यास नकार दिला.
इथिओपियन विमान माघारी
‘द जेरुसलेम पोस्ट’च्या वृत्तानुसार, इथिओपियन एअरलाईन्सचे तेल अवीवकडे जाणारे विमान इथिओपियाच्या हवाई क्षेत्रात असताना त्यात इंडोनेशियन पायलट असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर विमानाला अदीस अबाबा येथे परतण्यास सांगण्यात आले. तेथे संबंधित वैमानिक बदलल्यानंतर विमानाने पुन्हा उड्डाण केले आणि तेल अवीव गाठले. संबंधित वैमानिक इस्रायलला जाणारे विमान उडवू शकत नाही, याची माहिती आपल्याला नव्हती, असे सांगत इथिओपियन एअरलाईन्सने ही चूक झाल्याचे म्हटले आहे.