Israel Lebanon attack | इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले; 303 ठार, 1,150 जायबंदी

युद्धविराम शर्तींचा भंग; अमेरिका-इराण तणाव कायम : होर्मुझ खुली करण्यावरून संभ्रम
Israel Lebanon attack |
बेरूत : इस्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या भव्य इमारतीच्या ढिगार्‍याखाली अनेकजण गाडले गेले. तेथे बचावकार्य सुरू असताना.
Published on
Updated on

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी.सी./ तेहरान : इस्रायली सैन्याने बुधवारी आणि गुरुवारी लेबनॉनमध्ये शेकडो क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ले केले. यामध्ये 303 लोकांचा मृत्यू झाला. या हवाई हल्ल्यात किमान 1,150 लोक जायबंदी झाले. या हल्ल्यात लेबनॉनमधील बंडखोर गट हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागार अली युसूफ हर्शी याला ठार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. यामध्ये हिजबुल्लाच्या 100 हून अधिक कमांड सेंटर्स आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. लेबनॉनमधील लिटानी नदीच्या उत्तर ते दक्षिण भागात प्रवासासाठी वापरल्या जाणार्‍या दोन महत्त्वाच्या क्रॉसिंगवरही हल्ले केले आहेत. या मार्गांचा वापर हजारो शस्त्रे, रॉकेटस् आणि लाँचर्स यांच्या वाहतुकीसाठी केला जात होता.

अमेरिका आणि इराण यांच्यात बुधवारी युद्धविराम झाल्यानंतर संपूर्ण जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता; परंतु हा आनंद आता अल्पजीवी ठरण्याची शक्यता आहे. इराणने अमेरिकेवर युद्धबंदीच्या तीन प्रमुख अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणसोबत झालेला करार पूर्णपणे अंमलात येईपर्यंत अमेरिकन सैन्य इराणच्या आसपासच्या परिसरात तैनात राहील, अशी घोषणा केल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतरही मध्य पूर्वेतील परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्थिर झालेली नाही. या प्रदेशात तणाव कायम आहे. इराणचे नेते मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने 10 कलमी प्रस्तावातील मूलभूत अटींचा भंग केला आहे.

या तीन प्रमुख अटींचे उल्लंघन...

युद्धविरामानंतरही लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच

इराणच्या हवाई हद्दीचे उल्लंघन होत आहे

इराणच्या अणुकार्यक्रमाला अमेरिकेचा विरोध

होर्मुझ सामुद्रधुनी अद्याप खुली नाही

अबू धाबीच्या अडनॉक या सरकारी तेल कंपनीचे प्रमुख सुलतान अल जाबेर यांनी, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याचा जहाजांचा मार्ग अजूनही इराणकडून मर्यादित, अटींवर आधारित आणि नियंत्रित ठेवण्यात आला आहे.

अमेरिका : जर या कराराचे पालन केले गेले नाही, तर पुन्हा एकदा संघर्ष भडकेल आणि तो पूर्वीपेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिशाली आणि अधिक विनाशकारी असेल.

इराण : ज्या पायावर वाटाघाटी केल्या जाणार होत्या, तो पायाच ढासळला आहे. त्यामुळे या टप्प्यावर पुढील वाटाघाटी करणे किंवा युद्धबंदी कायम राखणे, तार्किकदृष्ट्या योग्य ठरत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news