

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, गाझामधून माघार घेण्यासाठी इस्रायलने सुरुवातीच्या माघार रेषेसाठी सहमती दर्शवली आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर ही माहिती दिली. ट्रम्प यांनी इस्रायलच्या माघारीचा एक नकाशाही शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पिवळ्या रेषेच्या माध्यमातून सांगितले आहे की, इस्रायली सैन्य पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत मागे हटेल. त्यांनी म्हटले, हा करार 3000 वर्षे जुने संकट संपवेल. याआधी ट्रम्प यांनी हमासला शांतता प्रस्ताव लवकरात लवकर स्वीकारण्याची धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, जर हमासने लढाई सुरू ठेवली तर त्यांचे सर्व पर्याय संपतील. ट्रम्प यांच्या नकाशानुसार, ही सुरुवातीची माघार रेषा (पिवळी रेषा) आयडीएफची जुनी नियंत्रण रेषा आहे. गेल्या महिन्यात आयडीएफने गाझावर मोठे हल्ले करून पुढे सरसकट केली होती. सध्या आयडीएफचा गाझाच्या सुमारे 70 टक्के भागावर ताबा आहे.
दक्षिण गाझामधील राफाह आणि फिलाडेल्फिया कॉरिडॉरसारखे भाग इस्रायलच्या नियंत्रणाखाली दाखवण्यात आले आहेत, जिथे सुरक्षा दल तैनात राहतील. उत्तर गाझामधील बेइत हनूनच्या आसपासचा भागही इस्रायली सुरक्षा क्षेत्र म्हणून दाखवण्यात आला आहे. गाझा सिटी आणि त्याच्या आसपासच्या निर्वासित छावण्या नकाशात अशा भागांच्या रूपात दाखवल्या आहेत, जिथून सध्या पूर्णपणे माघार घेतली जाणार नाही.
हमासने अद्याप या प्रस्तावावर औपचारिक सहमती दिलेली नाही. सोमवारपासून इजिप्तमध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. जर हमासने या योजनेला मंजुरी दिली, तर ट्रम्प प्रशासन पहिल्या टप्प्यातील माघार आणि शांतता व्यवस्था लागू करण्याची तयारी करेल. हमासने ट्रम्प यांच्या योजनेबद्दल म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या आठवड्यात सादर केलेल्या शांतता कराराच्या काही भागांवर चर्चा करणे आवश्यक आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, हमासकडून आलेल्या उत्तरात शस्त्रे खाली ठेवण्याबद्दल काहीही म्हटले नव्हते.