

बगदाद : Iraq Marriage Law | इराकमध्ये विवाहासंदर्भातील वैयक्तिक कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुधारित कायद्यानुसार ९ वर्षीय मुलीसोबत निकाह करण्याची परवानगी मिळणार आहे. दरम्यान, पुरोगामी संघटनांनी प्रस्तावित कायद्याला तीव्र विरोध केला आहे.
प्रस्तावित कायद्यानुसार महिलांना तलाक देण्याचा हक्कही काढून घेण्यात येणार आहे. शिवाय, अपत्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी पित्यावर सोपविण्यात येणार आहे. वारसा हक्कामधूनही महिलांना डावलण्यात येणार आहे. कौटुंबिक वाद उद्भवल्यास धार्मिक मंचावर अथवा न्यायिक पातळीवर कौटुंबिक वाद मिटवण्याची मुभा प्रस्तावित कायद्यात असणार आहे. इराकमध्ये शिया पंथीयांच्या पाठिंब्यावर कॉन्झव्र्हेटिव्ह सरकारची स्थापना करण्यात आली आहे. मुलींच्या अनैतिक संबंधांना अटकाव घालण्यासाठी ९ वर्षांतच मुलींच्या विवाहास संमती सुधारित कायद्यात देण्यात येणार आहे. शरिया कायद्यानुसार मुलींचे चारित्र्य जपण्यासाठी सुधारित कायदा करण्यात येणार असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. सुधारित कायदा करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. लॉ १८८ असे सुधारित कायद्याचे नाव आहे. हा कायदा पश्चिम आशियातील देशांसाठी सुधारणावादी असणार असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, इराकमधील महिला संघटनांनी प्रस्तावित कायद्याला प्रखर विरोध केला आहे.
'युनिसेफ'च्या अहवालानुसारही इराकमध्ये सध्या बालविवाहाचे प्रमाण २८ टक्के आहे. नव्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास परिस्थिती आणखी चिंताजनक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.