

दुबई; वृत्तसंस्था : जर आमच्यावर पुन्हा हल्ला झाला, तर आम्ही उपलब्ध असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी चोख प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास आराघची यांनी बुधवारी अमेरिकेला दिली. त्यामुळे इराणमधील सरकारविरोधी आंदोलकांवरील रक्तरंजित कारवाईनंतर आता इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे.
आराघची यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन आशियातून मध्यपूर्वेच्या दिशेने वेगाने सरकत आहे. या युद्धनौकेसोबत तीन विनाशक जहाजे देखील आहेत. याशिवाय, अमेरिकेने मध्यपूर्वेत -15 स्ट्राईक ईगल्स लढाऊ विमाने आणि हायमार्क क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्याचे लष्करी छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका लेखात आराघची यांनी लिहिले की, हे केवळ धमकी नसून वास्तव आहे. 2025 मध्ये इराणने जो संयम दाखवला होता, तो आता दाखवला जाणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांवरील हिंसाचार ही लक्ष्मण रेषा असल्याचे म्हटले असून, लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत.
इराणमधील आंदोलनात मृतांचा आकडा 4,519 वर पोहोचला असल्याचे मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे, तर 26,300 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. या भीषण हिंसाचारामुळे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणार्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आमंत्रण इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना नाकारण्यात आले. दरम्यान, इराकच्या कुर्दिस्तान भागात असलेल्या एका तळावर इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा एका फुटीरतावादी गटाने केला आहे.