Iran-US War : इराणचे आखातातील अमेरिकन तळांवर हल्ले; क्षेपणास्त्र यंत्रणा आणि रडार उडवले

US Iran War
Published on
Updated on

वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात आतापर्यंतचा सर्वात भीषण संघर्ष पाहायला मिळाला. अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १४ जणांचा मृत्यू झाला, तर याला प्रत्युत्तर म्हणून तेहरानने (इराण) आखातातील देशांमधील अमेरिकन तळांना जोरदार लक्ष्य केले. इराणने कतार, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन सैन्यतळांवर ड्रोन हल्ले केल्याचे म्हटले आहे.

इराणी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये कुवेतची ‘पॅट्रियट क्षेपणास्त्र यंत्रणा’, कतारचा ‘अर्ली वॉर्निंग सॅटेलाईट अँटेना’ आणि बहरीनमधील अमेरिकन सैन्याच्या इंधन टाक्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांसाठी मोठ्या संख्येने ड्रोनचा वापर करण्यात आला होता.

अमेरिकेने इराणवर सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. अमेरिकन सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) इराणच्या सुमारे ९० सैन्य तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

या हल्ल्यांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे साठे, लष्करी स्पीड बोटस्‌ तसेच होर्मुझ सामुद्रधुनीजवळील किनारपट्टीच्या भागात असलेल्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणमधील अहवाज येथे ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

इराणी सैन्यानेही अमेरिकेच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देणे सुरूच ठेवू, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणला शांतता करार हवा आहे; परंतु इराण या कराराचे तंतोतंत पालन करेल की नाही, यावर आपला विश्वास नाही, असे म्हटले आहे.

१७ जून रोजी कायमस्वरूपी शांतता करारासाठी वाटाघाटींना वेळ मिळावा आणि युद्धबंदीचा कालावधी वाढवला जावा, या उद्देशाने इराण आणि अमेरिकेत एक सामंजस्य करार झाला होता. हा करार झाल्यानंतर गुरुवारी दोन्ही देशांकडून हे सर्वात भीषण हल्ले झाले आहेत.

या हल्ल्यांदरम्यान बहरीनमध्ये किमान तीनवेळा धोक्याचे सायरन वाजले; याच बहरीनमध्ये अमेरिकन नौदलाच्या ‘फिफ्थ फ्लीट’चे मुख्यालय आहे. याशिवाय, इराणी क्षेपणास्त्रांनी कुवेत आणि कतारलाही लक्ष्य केले. मात्र, या हल्ल्यांमध्ये अद्याप कोणत्याही मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news