Iran vs US War : कठोर लष्करी कारवाई करू, ट्रम्प यांचा इराण, हुतींना इशारा; आखातात तणाव शिगेला

सलग १२ व्या रात्री अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले, लाल समुद्रात जहाजांवर हल्ल्यांमुळे तेल बाजार हादरला
Iran vs US War : कठोर लष्करी कारवाई करू, ट्रम्प यांचा इराण, हुतींना इशारा; आखातात तणाव शिगेला
Published on
Updated on

वॉशिंग्टन/तेहरान/दुबई : अमेरिका आणि इराण संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून मध्य पूर्वेतील तणाव धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकेने सलग १२ व्या रात्री इराणमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि त्याच्या पाठिंब्याखालील येमेनमधील हुती बंडखोरांना कडक इशारा देत, लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर पुन्हा हल्ले झाल्यास कठोर लष्करी कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, हुती बंडखोरांनी पुन्हा व्यापारी जहाजांना लक्ष्य केले तर त्यासाठी इराणलाच जबाबदार धरले जाईल. हुती हे इराणचे प्रॉक्सी आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडल्यास अमेरिका कठोर लष्करी कारवाई करेल,’ असा इशारा त्यांनी दिला.

इराणची पलटवाराची भूमिका

इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत ‘डोळ्याला डोळा’ अशा प्रत्युत्तराचा इशारा दिला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेची भूमिका दादागिरीची आणि अवास्तव असल्याची टीका करत, कोणत्याही दबावाला इराण झुकणार नसल्याचे सांगितले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌ने कुवेतमधील अल-अदिरी तळासह अमेरिकेच्या काही लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. त्यांनी जॉर्डन आणि कुवेतमधील अमेरिकन लष्करी सुविधांवरही हल्ले केल्याचा दावा केला; पण अमेरिका किंवा संबंधित देशांकडून त्याला दुजोरा मिळालेला नाही.

हुतींकडून लाल समुद्रात जहाजांवर हल्ले

येमेनमधील हुती बंडखोरांनी रेड सीमध्ये दोन सौदी तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा दावा केला आहे. त्यापैकी एका जहाजाला आग लागल्याचे सौदी प्रशासनानेही मान्य केले असून सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. युरोपियन युनियनने हुतींना तातडीने हल्ले थांबविण्याचे आवाहन केले आहे.

आखाती देशांमध्ये सतर्कता

इराणच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बहरीनमध्ये एअर रेड सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. कुवेतमध्येही सीमावर्ती भागावर ड्रोन हल्ले झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या हल्ल्यांत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी काही मालमत्तेचे नुकसान झाले आहे. संयुक्त अरब अमिरातीने इराणकडून बहरीन, कुवेत आणि जॉर्डनवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करत संबंधित देशांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news