

तेहरान; वृत्तसंस्था : मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली असून, इराणने रविवारी बहरीनमधील अमेरिकी लष्करी तळाला लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने सहा ड्रोनच्या माध्यमातून अमेरिकी हवाई संरक्षण यंत्रणेतील रडारला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, बहरीनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अडवून नष्ट केल्याचे देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. या घटनेनंतर मनामा परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहनही करण्यात आले.
इराणच्या अगदी समोर पर्शियन आखाताच्या दुसऱ्या किनाऱ्यावर बहरीन हे बेट राष्ट्र आहे. अमेरिकेच्या नौदलातील पाचव्या आरमाराचा ताफा बहरीनमध्ये तैनात असल्याने या देशाला सामरिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. अल-रिफा हेलिकॉप्टर तळावरील अमेरिकी रडार यंत्रणा लक्ष्य करण्यात आल्याचे इराणच्या माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या कथित शत्रुत्वपूर्ण कारवायांना प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांतील बहरीनवरील हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. शुक्रवारीही दोन ड्रोनद्वारे अमेरिकी रडार सुविधेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला होता.
बहरीनने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत इराणला जबाबदार धरले आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणाऱ्या या कारवाया तातडीने थांबवाव्यात, अशी मागणी बहरीनने केली. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडेही या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन आणि इजिप्त या देशांनीही इराणच्या हल्ल्याचा निषेध करत बहरीनला पाठिंबा दर्शवला. या हल्ल्यांमुळे आखातातील तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अमेरिका-इराण चर्चेत प्रगती नाही
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेत अद्याप कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. अमेरिका इराणवरील नौदल नाकेबंदी कायम ठेवून आहे, तर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची मंगळवारी ओमानला भेट देऊन तेथील परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. ओमान आणि कतार हे दोन्ही देश अमेरिका-इराणमधील चर्चेत मध्यस्थी करत आहेत.
इस्रायलचे गाझात हल्ले
दुसरीकडे, इस्रायलने गाझातील अल-मवासी निर्वासित छावणीवर केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा रफाह ब्रिगेडचा कमांडर समीर महमूद हसन अबू युनूस ठार झाला. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या नियोजनात त्याचा सहभाग असल्याचा इस्रायलचा दावा आहे.
लाल समुद्रातही परिस्थिती चिंताजनक
लाल समुद्र परिसरातील परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. येमेनमधील सौदीसमर्थित सरकारी सैन्याने बाब-अल-मंदेब परिसरातून माघार घेत एडन या अंतरिम राजधानीच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे इराणसमर्थित हुती बंडखोरांचा या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. एडनजवळ हुतींच्या हल्ल्यात पाचजणांचा मृत्यू, तर आठजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.