

तेहरान : इराणचे दीर्घकाळ सर्वोच्च नेते असलेले आयतुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर देशात नवीन सर्वोच्च नेता निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. इराणच्या असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्टस् या धर्मगुरूंच्या संस्थेने पुढील नेत्याबाबत बहुमताचा निर्णय घेतल्याची माहिती सदस्य आयतुल्ला मोहम्मद-महदी मिरबाघेरी यांनी दिली आहे.
इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सर्वोच्च नेत्याबाबत तत्त्वतः एकमत झाले असले तरी काही तांत्रिक अडचणी अद्याप सोडवायच्या बाकी आहेत. इराणच्या संविधानानुसार देशाचा सर्वोच्च नेता निवडण्याचा अधिकार 88 सदस्यीय असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्टस् या संस्थेकडे आहे. ही संस्था देशातील वरिष्ठ धर्मगुरूंनी बनलेली आहे आणि सर्वोच्च नेत्याची निवड, त्याचे मूल्यांकन आणि आवश्यक असल्यास त्याला पदावरून हटवण्याचा अधिकारही या सभेकडे आहे. 28 फेब्रुवारी रोजी तेहरानवर झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला.
शत्रूंना न आवडणारा नेता
इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, अंतिम निर्णयासाठी प्रत्यक्ष बैठक घ्यावी की दूरस्थ पद्धतीने निर्णय जाहीर करावा यावर सदस्यांमध्ये थोडा मतभेद झाला आहे. असेम्ब्लीचे सदस्य आयतुल्ला मोहसेन हैदरी अलेकासीर यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत सर्व सदस्यांची प्रत्यक्ष बैठक घेणे शक्य नाही. मात्र, खामेनी यांच्या सूचनेनुसार ‘शत्रूंना न आवडणारा नेता’ निवडला जावा या निकषावर उमेदवार निवडण्यात आला आहे.