पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलने केलेले सर्व हवाई हल्ले आम्ही हाणून पाडले आहेत. या हल्ल्यात दोन सैनिक ठार झाले आहेत, असा दावा इराणने केल्याचे वृत्त अल जजिराने दिले आहे. १ ऑक्टोबर रोजी इराणने इस्त्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने आज (दि.२६) पहाटे इराणवर हवाई हल्ले केले. दरम्यान, अमेरिकेने इराणला प्रत्युत्तराच्या हल्ल्याचा इशारा देत दोन्ही देशांनी एकमेकांवर लष्करी हल्ले थांबवण्याचा सल्लाही दिला आहे. (Israel-Iran war)
इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर इराणने जारी केलेल्या निवदेनात म्हटलं आहे की, आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इस्रायलचे अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केले. क्षेपणास्त्रे आणि रॉकेटमुळे फारच कमी नुकसान झाले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये सहा स्फोटांचे आवाज ऐकू आले. हवाई संरक्षण यंत्रणांनी तेहरानमधील तीन ठिकाणी हल्ले हाणून पाडले. या हल्ल्यात दोन सैनिक ठार झाले आहेत. दरम्यान, इराणच्या लष्करी लक्ष्यांवर केलेले हल्ले पूर्ण अचूकतेने करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.
इस्त्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे की, इस्त्रायलला धमकावण्याचा प्रयत्न करणार्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा आमचा स्पष्ट संदेश आहे. इस्रायलच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही तयार आहोत.
अमेरिकाही इस्रायलच्या समर्थनात उतरली आहे. इराणवरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील थेट लष्करी हल्ले थांबले पाहिजेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच इराणने कोणतीही प्रत्युत्तराची कारवाई करु नये, असा इशारा दिला आहे. इराणवर हल्ला होण्यापूर्वीच इस्रायलने व्हाईट हाऊसला याची माहिती दिली होती, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.