पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणला युद्ध नको आहे, मात्र इस्रायलने हल्ला केल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे. ( Israel-Iran war)
द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी हे दोन दिवसांच्या इराण दौर्यावर आहेत. इराणच्या राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी बुधवारी (दि. २ ऑक्टोबर) त्यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, इराणला युद्ध नको आहे, मात्र इस्रायलने हल्ला केल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ इस्रायल सरकारने त्यांचे गुन्हे थांबवले नाहीत तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. आता इराणला इस्रायलच्या प्रत्युत्तराची भीती वाटत आहे. इराण हाय अलर्टवर आहे. हल्ल्याच्या भीतीने इरणाने आपले १२ तेल-वायू ऊर्जा प्रकल्प बंद केले आहेत. शस्त्रास्त्रांचे डेपो आणि बंदरे अशा महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
इस्त्रायलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे सुरक्षा सल्लागार फिल गॉर्डन यांनी आज ( ३ ऑक्टोबर) गुरुवारी मुस्लिम आणि अरब देशांच्या नेत्यांसोबत पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसमधील एका फ्लॅटवर हल्ला करून हिजबुल्लाहचा इस्त्रायल हल्ल्यात ठार झालेला म्होरक्या हसन नसराल्लाचा जावई हसन जाफर अल कासिर याची हत्या केली आहे. हिजबुल्लाहनेही हसनच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.