Iran missile attack Kuwait | कुवेतच्या तेल प्रकल्पावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; वीज निर्मिती आणि जलशुद्धीकरण केंद्रांचेही मोठे नुकसान

Iran missile attack Kuwait |
Iran missile attack Kuwait | कुवेतच्या तेल प्रकल्पावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; वीज निर्मिती आणि जलशुद्धीकरण केंद्रांचेही मोठे नुकसान
Published on
Updated on

कुवेत सिटी; वृत्तसंस्था : आखाती देशांमधील तणाव आता टोकाला पोहोचला असून, रविवारी इराणने कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुवेत सिटीमधील मंत्रालय संकुल आणि शुवेख भागातील तेल क्षेत्र संकुल प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्ल्यांमुळे सरकारी इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, हे हल्ले इराणी आक्रमकतेतून होत असल्याचे कुवेतच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

इराणी ड्रोननी केवळ सरकारी इमारतींनाच नव्हे, तर कुवेतच्या अत्यंत महत्त्वाच्या नागरी पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले. कुवेतच्या वीज आणि पाणी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन मुख्य वीज निर्मिती आणि जलशुद्धीकरण (डिस्टिलेशन) केंद्रांवर ड्रोन पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोन वीज संच निकामी झाले आहेत. पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कुवेतमध्ये पिण्याच्या पाण्याचा 90 टक्के पुरवठा याच प्रकल्पांतून होतो.

हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित

हल्ल्यावेळी कुवेतच्या लष्कराने आपली हवाई संरक्षण यंत्रणा (एअर डिफेन्स सिस्टीम) सक्रिय केली होती. लष्कराने एक्स पोस्टवर माहिती दिली की, कुवेती हवाई दलाने अनेक शत्रू ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली आहेत.

बहरीन आणि अबुधाबीमध्येही हल्ले

कुवेतसोबतच बहरीन आणि अबुधाबीमध्येही इराणने हल्ले केले आहेत. बहरीनच्या तेल साठवणूक केंद्रांना लक्ष्य करण्यात आले, तर अबुधाबीमध्ये ड्रोनच्या अवशेषांमुळे पेट्रोकेमिकल प्लांटमध्ये आग लागली. सौदी अरेबियानेही रविवारी सकाळी अनेक क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.

ड्रोन हल्ल्यानंतर मोठी आग

कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (केपीसी) पुष्टी केली आहे की, शुवेख येथील तेल मंत्रालय आणि केपीसी मुख्यालय असलेल्या संकुलात ड्रोन हल्ल्यानंतर मोठी आग लागली होती. याशिवाय, पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज कंपनी आणि नॅशनल पेट्रोलियम कंपनीच्या विविध युनिटस्मध्येही आगीच्या घटना घडल्या आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्नी कुवेतसह संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि बहरीनमधील पेट्रोकेमिकल प्रकल्पांवरील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news