पुढारी ऑनलाईन :
एकीकडे इस्रायलने ईराणवर आपली लष्करी कारवाई पूर्ण झाल्याची घोषणा केली. तर दुसरीकडे ईराणने इस्रायलच्या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ईराणच्या अर्ध-अधिकृत तस्नीम वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराण इस्रायलच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. तस्नीमने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या हल्ल्याला इस्रायलला समर्पक प्रत्युत्तराचा सामना करावा लागेल यात शंका नाही. (Isreal Attack Iran)
इराणने आपले हवाई क्षेत्र बंद करून, पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणांवर बंदी घातली आहे. इराणच्या नागरी विमान वाहतूक संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, पुढील सूचना येईपर्यंत सर्व मार्गावरील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या विषयी इराणची राज्य वृत्तसंस्था IRNA ने वृत्त दिले आहे.
इराणचे म्हणणे आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इस्रायलचे हल्ले यशस्वीपणे परतवून लावले, परंतु काही ठिकाणी मर्यादित नुकसान झाले. इराणच्या एअर डिफेन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलने तेहरान, खुजेस्तान आणि इलम प्रांतातील लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला.
दुसरीकडे, इराणमध्ये इस्रायली हल्ले पूर्ण झाल्यानंतर, आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी एका निवेदनात इशारा दिला की इराणने पुन्हा हल्ले करण्याची चूक केली तर इस्रायल त्याला प्रत्युत्तर देईल. ते म्हणाले, "मी आता पुष्टी करू शकतो की आम्ही इराणच्या हल्ल्यांना दिलेले उत्तर आता पूर्ण केले आहे. आम्ही इराणमधील लष्करी लक्ष्यांवर लक्ष्यित आणि अचूक स्ट्राइक केले - इस्रायलच्या तात्काळ धोक्यांना आळा घालत इस्रायल संरक्षण दलांनी त्यांचे ध्येय पूर्ण केले." ते पुढे म्हणाले, "जर इराणच्या राजवटीने पुन्हा कोणत्याही नापाक कृत्याद्वारे नवीन हल्ल्याची सुरूवात करण्याची चूक केली तर त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत.