

तेहरान/तेल अवीव; वृत्तसंस्था : अमेरिकेने इराणची युद्धनौका बुडवल्यानंतर आणि इराणने संपूर्ण प्रदेशातील लष्करी आणि आर्थिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्यानंतर गुरुवारी पहाटे इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. पश्चिम आशियातील हवाई हल्ल्यांचा हा सलग सहावा दिवस आहे.
इस्रायलने लेबनॉनमधील इराण समर्थित हिजबुल्लाच्या बैरुत येथील तळांवर नवीन हल्ले सुरू केल्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच हा क्षेपणास्त्र हल्ला झाला. इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, इराणकडून इस्रायलच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे ओळखण्यात आली असून, आमची संरक्षण यंत्रणा त्यांना पाडण्यासाठी सज्ज आहे.
सर्वोच्च नेते खामेनी यांचा अंत्यविधी लांबणीवर
इराणने त्यांचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अंत्यविधी पुढे ढकलला आहे. बुधवारी रात्री 10 वाजता तेहरानमध्ये अंत्यविधी होणार होता, परंतु सरकारी माध्यमांनी कोणतेही कारण न देता तो स्थगित केल्याचे जाहीर केले.
अझरबैजानवरील ड्रोन हल्ल्याचा इराणकडून इन्कार
अझरबैजानने इराणच्या ड्रोन हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाल्याचा दावा केल्यानंतर, इराणच्या सशस्त्र दलांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. इराणच्या जनरल स्टाफने निवेदनात म्हटले आहे की, इराणने अझरबैजानवर कोणताही ड्रोन हल्ला केलेला नाही. मुस्लीम देशांमधील संबंध बिघडवण्यासाठी इस्रायलकडून कारस्थान रचले जाणे नवीन नाही.
इराणचा नवा सर्वोच्च नेता अद्याप अनिश्चित
गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाल्यानंतर, इराणने अद्याप त्यांच्या वारसाची निवड केलेली नाही. इराणच्या सर्वोच्च नेत्याचे भारतातील प्रतिनिधी अयातुल्ला अब्दुल माजिद हकीमेलाही यांनी स्पष्ट केले की, नव्या नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांत महापौरांसह 8 जणांचा मृत्यू
बैरुत : इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा तीव्र हवाई हल्ले सुरू केले असून, आज झालेल्या विविध हल्ल्यांत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. लेबनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण लेबनॉनमधील नाबातिएह प्रांतातील एका गावच्या महापौरांचा आणि त्यांच्या पत्नीचा एका हल्ल्यात मृत्यू झाला. तर जवळच असलेल्या दुसर्या गावात झालेल्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांना जीव गमवावा लागला. याशिवाय, पूर्व लेबनॉनमधील झहले शहराजवळ एका कारवर झालेल्या हल्ल्यात दोनजणांचा मृत्यू झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.