

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : इराणच्या शिष्टमंडळाने इस्लामाबादला वाटाघाटीसाठी जाताना जगासमोर एक अस्वस्थ करणारा आरसा धरला. विमानाने आकाशात झेप घेतली खरी; पण त्यातील अनेक जागांवर जिवंत माणसे नव्हती. त्या रिकाम्या खुर्च्यांवर होते मिनाब दुर्घटनेत बळी पडलेल्या शाळकरी मुलांचे हसरे फोटो, त्यांचे रंगीबेरंगी स्कूल बॅग्ज, छोटेसे बूट आणि काही ताजी गुलाबाची फुले...
ही केवळ जागा भरण्यासाठी केलेली मांडणी नव्हती, तर ज्या कोवळ्या कळ्या उमलण्याआधीच लष्करी हल्ल्यात करपून गेल्या, त्यांचे अस्तित्व जागतिक पटलावर मांडण्याचा एक मूक आक्रोश होता.
इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर कालीबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळ शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. कालीबाफ यांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, तेव्हा त्यासोबतच्या ओळींनी अनेकांचे डोळे ओलावले. त्यांनी या मृत बालकांना आपले प्रवासातील साथीदार म्हटले आहे. या दौर्यात त्यांच्या या हृदयस्पर्शी आणि प्रतीकात्मक कृतीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मिनाब येथील प्राथमिक शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 160 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. इराणने या हल्ल्याचा थेट ठपका अमेरिकेवर ठेवला असून, चर्चेपूर्वी जागतिक समुदायाचे लक्ष या मनुष्यहानीकडे वेधण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.