

तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-35 लाटनिंग ॥ लढाऊ विमान लक्ष्य करून इतिहास घडवल्याचा दावा इराणने केला आहे. जगातील सर्वात प्रगत पाचव्या पिढीतील या स्टेल्थ फायटरला प्रथमच लक्ष्य करण्यात आले आहे.
अमेरिकन संरक्षण अधिकार्यांनी मान्य केले की, एका एफ-35 विमानाला इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमान सुरक्षितपणे उतरले असून वैमानिक सुरक्षित आहे; मात्र विमानाच्या नुकसानाबाबत तपास सुरू आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले की, त्यांच्या आधुनिक हवाई संरक्षण प्रणालींनी पहाटे 2.50 वाजता मध्य इराणच्या हवाई क्षेत्रात हे विमान लक्ष्य केले. त्यांच्या मते, या हल्ल्यानंतर विमान कोसळण्याची शक्यता जास्त असून त्याचा अंतिम परिणाम अजून स्पष्ट नाही.
आयआरजीसीने असेही सांगितले की, त्यांनी यापूर्वी 125 हून अधिक अमेरिकन-इस्रायली ड्रोन पाडले आहेत. यामुळे इराणच्या हवाई संरक्षण व्यवस्थेत मोठी सुधारणा झाल्याचे संकेत मिळतात. घटनेनंतरही अमेरिकेने आपली भूमिका ठाम ठेवली आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित एफ -35 विमानाने मध्यपूर्वेतील एका अमेरिकन तळावर सुरक्षित लँडिंग केले. ‘वैमानिकाची प्रकृती स्थिर असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे,’ असे त्यांनी सांगितले. सुमारे 100 दशलक्ष डॉलर किमतीचे हे अत्याधुनिक स्टेल्थ विमान इराणच्या हल्ल्यामुळे बाधित झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अमेरिकेने अधिकृत पुष्टी दिलेली नाही.