US Underwater Drone | यूएसचे अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन इराणच्या कात्रीत

होर्मुझजवळ ‘डाईव्ह-एलडी’ ताब्यात घेतल्याचा दावा
US Underwater Drone |
US Underwater Drone | यूएसचे अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन इराणच्या कात्रीत
Published on
Updated on

तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिकेची अत्याधुनिक मानवरहित पाण्याखालील यंत्रणा अर्थात अंडरवॉटर ड्रोन ताब्यात घेतल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या प्रवेशाजवळ ही कारवाई केल्याचे इराणने म्हटले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी ताब्यात घेतलेली यंत्रणा अमेरिकन संरक्षण तंत्रज्ञान कंपनी ‘अँड्युरिल इंडस्ट्रीज’ने विकसित केलेली ‘डाइव्ह-एलडी’ असल्याचे म्हटले आहे. आयआरजीसीने या यंत्रणेला महत्त्वाची लष्करी कामगिरी पार पाडण्यास सक्षम असल्याचे सांगत तिचा ताबा हा महत्त्वाचा विजय असल्याचे म्हटले आहे.

‘डाईव्ह-एलडी’ म्हणजे काय?

डाईव्ह-एलडी हे सुमारे ५.८ मीटर लांबीचे आणि तीन टन वजनाचे पाण्याखालील स्वयंचलित वाहन आहे. मानवी चालक किंवा क्रूशिवाय पाण्याखाली दीर्घकाळ काम करण्यासाठी त्याची निर्मिती केली आहे. हे ड्रोन १० दिवस तळावर परत न येता काम करू शकते आणि जवळपास ६ हजार मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते. मॉड्युलर रचनेमुळे गरजेनुसार त्यावर वेगवेगळे सेन्सर आणि उपकरणे बसवता येतात. गुप्त माहिती गोळा करणे, समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणे, समुद्रतळाचे नकाशे करणे तसेच समुद्रातील केबल आणि पाईपलाइनसारख्या पायाभूत सुविधांची तपासणी करणे अशा कामांसाठी वापर होऊ शकतो.

एका ड्रोनची किंमत २.५ दशलक्ष डॉलर

२०२४ मध्ये एका डाईव्ह-एलडीची किंमत सुमारे २.५ दशलक्ष डॉलर होती. अमेरिकन नौदलाला २०२५ पासून ही वाहने मिळण्यास सुरुवात झाली. अमेरिकन नौदलाच्या मानवरहित पाण्याखालील युनिट्समध्ये त्यांचा वापर केला जात आहे. अँड्युरिल अमेरिकन नौदलासाठी यापेक्षा मोठी ‘डाईव्ह-एक्सएल’ प्रणालीही विकसित करत आहे. या प्रणालीची रचना ऑस्ट्रेलियाच्या ‘घोस्ट शार्क’ या स्वायत्त पाणबुडीशी काही प्रमाणात साम्य दर्शवते. इराणने डाईव्ह-एलडी ताब्यात घेतली असेल, तर त्याला अमेरिकेच्या या ड्रोन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळू शकते.

ते ड्रोन बिघडल्याचा अमेरिकेचा दावा

पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अंडर वॉटर ड्रोन इराणने ताब्यात घेण्याच्या एक दिवसापेक्षा अधिक काळ आधीच बिघडले होते. ते नियमित कारवाईदरम्यान प्रादेशिक समुद्राच्या पाहणीसाठी वापरला जात होते. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हा जुना डाईव्ह-एलडी मॉडेल असल्याचे सांगितले. त्यामध्ये संवेदनशील माहिती नव्हती तसेच कोणतीही गोपनीय सोनार किंवा रडार उपकरणे नव्हती, असा अमेरिकेचा दावा आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनेही ड्रोन बराच काळ पाण्यात निष्क्रिय अवस्थेत असल्याचे स्पष्ट केले.

इराणकडून छायाचित्रे प्रसिद्ध

ताब्यात घेतलेल्या ड्रोनची छायाचित्रे इराणने प्रसिद्ध केली आहेत. छायाचित्रे आणि व्हिडीओमध्ये अर्धवट पाण्यात असलेले ड्रोन दिसते. त्याचा आकार, पाण्याच्या प्रवाहासाठी असलेली छिद्रे, जोडणीची रचना आणि लहान पारदर्शक मस्तूल यांसारखे तपशील डाईव्ह-एलडीशी जुळत असल्याचे दिसून येते.

logo
Pudhari News
pudhari.news