

तेहरान, दुबई : वृत्तसंस्था : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणाव अधिक वाढला असून, इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे बहरीनच्या सरकारी तेल कंपनी बॅप्कोने सोमवारी आपल्या तेलपुरवठ्यावर ‘फोर्स मॅज्युअर’ घोषित केले. इराणी हल्ल्यात कंपनीच्या रिफायनरी संकुलाला आग लागल्याने उत्पादन आणि निर्यात यावर गंभीर परिणाम झाला आहे.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे आणि रिफायनरीवरील ताज्या हल्ल्यामुळे समूहाच्या अनेक ऑपरेशन्सवर परिणाम झाला असून त्यामुळे ‘फोर्स मॅज्युअर’ लागू करण्यात आले आहे. अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारीपासून इराणवर केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने आखाती देशांमधील अमेरिकन तळ आणि ऊर्जा सुविधांवर हल्ले सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण आखाती हवाई क्षेत्र बंद करण्यात आले असून तेल उत्पादन आणि पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला आहे.
सौदी अरेबियाने शायबहा तेलक्षेत्राकडे येणारे चार ड्रोन पाडल्याची माहिती दिली आहे. तर संयुक्त अरब अमिरात, कतार आणि कुवेत यांनीही क्षेपणास्त्र हल्ल्यांची नोंद केली आहे. रविवारी सौदी अरेबियातील ‘अल-खार्ज’ प्रांतात एका निवासी भागात क्षेपणास्त्राचा तुकडा पडल्याने किमान दोन जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले.
कतारमधून वृत्त देताना पत्रकार मोहम्मद जमजूम यांनी सांगितले की, पहाटे सुमारे 3.15 वाजता हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांनी इराणी हल्ले रोखताना सुमारे 12 ते 13 स्फोटांचे आवाज ऐकू आले.
दरम्यान, इराणमधील नवीन सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनी यांच्या नियुक्तीनंतर इस्रायलने मध्य इराणमध्ये नवीन हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. या संघर्षात आतापर्यंत इराणमध्ये 1,255 हून अधिक लोक ठार झाले असून, हजारो जखमी झाले आहेत. युद्धामुळे जागतिक तेलबाजारातही मोठी खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेली असून, याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.