मेक इन इंडियात तैवानचा औद्योगिक पार्क

तैपेई : विलास तोकले, पीटीआय

चीनच्या दृष्टिकोनाचा तैवानच्या भारतविषयक धोरणावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही तैवानच्या परराष्ट्र व्यापार वृद्धी परिषदेचे प्रमुख जेम्स हाँग यांनी दिली. दोन्ही देशांत उभयतांकडून गुंतवणूक व्हावी तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. हाँग हे तैवानचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत भारतात इंडस्ट्रीअल पार्क आणि पेट्रोकेमिकल पार्क उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्‍त केला.

तैवान हा चीनसाठी संवेदनशील विषय असून, या भागावर चीनने दावा केला आहे. आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेले तैवान हे बेट एक चीनचा भाग आहे, असे चीनचे म्हणणे आहे.

तैवानने भारताशी संबंध वाढवल्यास चीनची नाराजी ओढवेल असे विचारले असता ते म्हणाले, बीजिंगला काय म्हणायचे आहे, ते मी सांगू शकत नाही, किंवा ते जगाच्या या भागाकडे कसे पाहतात तेही मी सांगू शकत नाही. भारताचे सध्या तैवानशी राजकीय संबंध नाहीत. तैवानची राजधानी तैपेईत भारत-तैपेई असोसिएशन असून, तैवानने भारतात तैपेई इकॉनॉमिक कल्चरल सेंटर स्थापन केले आहे. तैवान आणि इतर देशांतील औपचारिक संपर्कास चीनने विरोध केला आहे, तसेच एक चीन धोरणाचे पालन करा, अशी सूचना भारताला केली आहे. चीनच्या या धोरणाचा भारताशी संबंधावर कोणताही परिणाम होणार नाही, असे हाँग म्हणाले.  

या भागात असलेल्या भूराजकीय वादात आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही. व्यापार गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण हाच आमचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. तैवान जे काही करीत आहे, बीजिंगने त्याकडे राजकीय परिप्रेक्षातून पहावे.  

तैवानच्या मंत्र्यांनी संसदेत केलेली काही विधाने तसेच आमचे शैक्षणिक धोरण, तैवानमधील पाठ्यपुस्तकांतील अभ्यासक्रम यांसंदर्भात चीनची भावना नकारात्मक असणे शक्य आहे. हे सर्व राजकीय आहे आणि चीनमधून तैवान वेगळे करण्याची ही चाल आहे, असे चीन म्हणू शकतो, असेही त्यांनी सांगितले. 

मुक्‍त व्यापार करारासंदर्भात भारताशी बोलणी करावीत, अशी तैवानची भावना आहे. भारतानेही 2014 साली अशी भावना व्यक्‍त केली होती. एलसीडी स्क्रीन आणि पर्सनल कॉम्प्युटर अशा क्षेत्रातील काही तैवानी कंपन्या भारतात गुंतवणूक करतील, अशी माहितीही हाँग यांनी दिली. 

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या देशांशी व्यापारी संबंध वाढवण्याचा तैवानचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञानाशिवाय पेट्रोकेमिकल आणि अन्‍नप्रक्रिया या क्षेत्रांतही भारत तैवान सहकार्य शक्य असल्याचे ते म्हणाले. 

Tags : Industrial Park, Taiwan, Make In India,

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news