इंडोनेशियामध्ये हाहाकार: भूस्खलन, पुरामुळे १६ जणांचा मृत्यू ; ९ जण बेपत्ता
पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडोनेशियातील जावा बेटावरील डोंगराळ गावांमध्ये अचानक भूस्खलन आणि पुरामुळे (Indonesia Floods) हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. रेस्क्यू टीमने चिखल आणि खडकाखाली मृतदेह बाहेर काढले. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्यापही ९ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. (Indonesia Disaster News)
इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख बुर्गास कॅटुरसासी म्हणाले की, सोमवारी झालेल्या पावसामुळे नद्यांना महापूर आला. यामुळे मध्य जावा प्रांतातील पेकालोंगन भागातील ९ गावे पाण्याखाली गेली. याशिवाय डोंगराळ वस्त्यांमध्ये भूस्खलन झाल्याने चिखल, दगड आणि झाडे पडली आहेत.
पेटुंगक्रियोनो गावातून त्यांनी किमान १६ लोकांचे मृतदेह बाहेर काढले. तर बचाव कर्मचारी ९ ग्रामस्थांचा शोध घेत आहेत. कातुरसारी म्हणाले की, दहा जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. इंडोनेशियामध्ये ऑक्टोबर ते मार्च या काळात हंगामी पाऊस पडतो. यामुळे अनेकदा पूर आणि भूस्खलन होते. इंडोनेशियामध्ये १७ हजार बेटे असून येथे लाखो लोक डोंगराळ भागात राहतात.
जुलै २०२४ मध्ये सोन्याच्या खाणीत भूस्खलन
जुलै २०२४ मध्ये, इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर मुसळधार पावसामुळे एका बेकायदेशीर सोन्याच्या खाणीत भूस्खलन झाले होते. भूस्खलनामुळे किमान १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ जण बेपत्ता होते. काही घरेही उद्ध्वस्त झाली होती. इंडोनेशियाच्या आपत्ती एजन्सीने (बीएनपीबी) सांगितले की, भूस्खलनामुळे अनेक घरे आणि एका पुलाचे नुकसान झाले आहे.

