Indo-Tibetan Border | चीन सीमेवर भारतीय जवानांची ‘अभेद्य भिंत’; ‘आयटीबीपी’कडून 29 नव्या चौक्यांची उभारणी

Indo-Tibetan Border |
Indo-Tibetan Border | चीन सीमेवर भारतीय जवानांची ‘अभेद्य भिंत’; ‘आयटीबीपी’कडून 29 नव्या चौक्यांची उभारणी File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत-चीन सीमेवरील सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी इंडो-तिबेटियन सीमा पोलिस (आयटीबीपी) दलाने सन 2020 नंतर 29 नव्या सीमा चौक्या (बीओपी) उभारल्या आहेत. याद्वारे चीनसोबतच्या 3,488 किलोमीटर लांबीच्या या संवेदनशील सीमारेषेवर भारताने आपली उपस्थिती अधिक प्रभावीपणे वाढवली आहे.

2020-21 च्या अहवालात ‘आयटीबीपी’च्या 180 सीमा चौक्यांचा उल्लेख होता. आता ती संख्या वाढून 209 वर पोहोचली आहे. यामुळे सीमावर्ती भागात नजर ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उच्च हिमालयातील कठीण परिस्थितीत ‘आयटीबीपी’चे जवान ‘अभेद्य भिंत’ बनून उभे आहेत. नव्या चौक्यांमुळे भारताची सीमासुरक्षा अधिक मजबूत झाली असून, देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सज्जता वाढली आहे. 2020 मध्ये लडाखमधील गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारताने सीमावर्ती पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर विशेष भर दिला. नव्या चौक्यांची उभारणी हे त्याचाच भाग आहे.

कडक गस्त आणि सतत नजर

एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत ‘आयटीबीपी’ने भारत-चीन सीमेवर तब्बल 4,503 गस्त घातल्या आहेत. यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तत्काळ लक्षात येऊन कारवाई करणे शक्य होत आहे. सीमावर्ती भागात वाढवलेली उपस्थिती आणि पायाभूत सुविधा भारताच्या संरक्षण धोरणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे चीनकडून होणार्‍या कोणत्याही हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सुरक्षा जाळे

गृह मंत्रालयाच्या 2024-25 च्या अहवालानुसार, या नव्या चौक्या हिमालयाच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व भागात उभारण्यात आल्या आहेत. लडाखमधील काराकोरम खिंड ते अरुणाचल प्रदेशातील जाचेप खिंड या संपूर्ण पट्ट्यात या चौक्यांचे जाळे उभारले गेले आहे.

9 हजार ते 18 हजार फूट उंचीवर तैनाती

हिमालयीन भागातील या सीमा चौक्या सुमारे 9000 फूट ते 18,750 फूट उंचीवर आहेत. अत्यंत कठोर हवामान, कमी ऑक्सिजन आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीत ‘आयटीबीपी’चे जवान सतत तैनात राहून देशाची सुरक्षा करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news