

नवी दिल्ली/वॉशिंग्टन; पीटीआय/पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वैयक्तिकरीत्या फोन न केल्यामुळे प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करार अद्याप होऊ शकलेला नाही, असा दावा अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी केला. भारताने हा दावा फेटाळून लावला असून, मोदी यांनी ट्रम्प यांना 8 वेळा फोन केल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार कोंडीबाबत बोलताना लुटनिक म्हणाले की, भारतावर आयात शुल्क लादण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आहे. मी भारतासोबत यासंदर्भात याआधी चर्चा केली आहे. मोदी यांनी ट्रम्प यांना याबाबत फोन केल्यासच बोलणी पुढे जातील, अशी मी भारतास कल्पना दिली होती. भारताने मात्र माझ्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. मोदी यांनी फोन न केल्यामुळेच टॅरिफसंदर्भातील करार रखडला आहे. अन्य देशांनी अमेरिकेसोबत करार केले. भारत मात्र याबाबत माघारी राहिल्याचेही त्यांनी नमूद केले. भारताच्या आधी ब्रिटनसह अन्य देशांनी अमेरिकेसोबत करार केल्यामुळे त्यांना लाभ झाल्याचा दावाही त्यांनी केला.
‘क्या से क्या हो गया...
तेरी दोस्ती में’
लुटनिक यांच्या दाव्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. यासाठी काँग्रेसने बॉलीवूडच्या 60 च्या दशकातील जुन्या चित्रपटातील गाण्याच्या ओळींचा आधार घेतला आहे, ‘हग ना रहा, पोस्ट ना रहा... क्या से क्या हो गया बेवफा तेरी दोस्ती में...’ अशा शब्दांत जयराम रमेश यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर उपरोधिक टीका केली.
भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भात अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी केलेल्या वक्तव्याला भारत सरकारने चुकीचे ठरवले आहे. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आठवेळा चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निदर्शनास आणून दिले. दोन्ही देश अनेकदा कराराच्या जवळ पोहोचले होते आणि परस्पर फायदेशीर करारात अजूनही रस आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.