मुर्शिदाबाद : वृत्तसंस्था
भारत-बांगला देश सीमेवर 2015 नंतर प्रथमच बांग्लादेशकडून गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बांगला देशच्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला असून, दुसरा एक जवान जखमी झालेला आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत.
बांगला देशच्या 'बीजीबी'ने (बॉर्डर गार्डस् बांगला देश) डांबून ठेवलेल्या भारतीय मच्छीमारांचा बीएसफकडून शोध सुरू असताना बांगलादेशी सैनिकांनी सीमेपलीकडून हा गोळीबार केला. भारत-बांगला देश सीमेलगत तीन मच्छीमार गुरुवारी पद्मा नदीवर मासेमारीसाठी गेले होते. दोन मच्छीमार परत आले, पण एक अद्याप बीजीबीच्याच ताब्यात आहे, असे परत आलेल्या दोघांनी बीएसएफला सांगितले. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काकमारिचार सीमा पोस्टवर सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
बीएसएफच्या जवानांचा कमांडर हा विषय मिटविण्यासाठी एका बोटीतून सहा सहकार्यांसह निघाला. त्यावेळी बीजीबीच्या सैनिकांनी भारतीय मच्छीमाराला तर सोडले नाहीच, उलट भारतीय जवानांना घेरले व बंदुकांच्या निशाण्यावर घेतले. बीजीबीच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे विजय भानसिंग हे मुख्य हवालदार जागीच शहीद झाले. राजवीर यादव हे जखमी झाले.