

Indian Student Killed In Canada: भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कॅनडाच्या टोरोंटो विद्यापीठात झाला आहे. कॅम्पसमध्ये एका अज्ञात हल्लेखोराने २० वर्षाच्या वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यावर गोळीबार केला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा आता मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव शिवांक अवस्थी असून त्याच्यावर गुरूवारी टोरोंटो इथं गोळीबार झाला. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केलं आहे.
पोलिसांनी आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितलं की, 'गुरूवारी २३ डिसेंबर २०२५ रोजी जवळपास ३ वाजून ३४ मिनिटांनी पोलिसांना हायलँड क्रीक आणि ओल्ड किंगस्टन रोड भागात इथं काहीतरी घडल्याची माहिती मिळाली.'
पोलिसांनी सांगितले की, 'पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांना एक पुरूष गोळी लागल्याने जखमी झाल्याचे आढळून आलं. दरम्यान, या पीडित तरूणाला जागेवरच मृत घोषित करण्यात आलं. जोपर्यंत पोलीस आले तोपर्यंत गोळी मारणारा आरोपी त्या भागातून पळून गेला होता. मृत झालेल्या २० वर्षाच्या तरूणाची ओळख पटली असून शिवांक अवस्थी असं त्याचं नाव आहे.
दरम्यान, भारतानं शिवांक अवस्थीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर वेदाना झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. टोरोंटोमधील भारतीय काऊन्सीलेट जनरल यांनी ट्विट करून पीडित तरूणाच्या कुटुंबियांना लागणारी सर्व मदत करणार असल्याचं सांगितलं.
'वैद्यकीय खाशेत शिकणारा भारतीय विद्यार्थी शिवांक अवस्थीच्या झालेल्या दुर्दैवी हत्येवर आम्ही सहवेदना व्यक्त करत आहोत. त्याच्यावर टोरोंटो विद्यापीठाच्या स्कारबोर्ग कॅम्पस जवळ गोळीबार करण्यात आला होता.' असं ट्विट उच्चायुक्तालयानं केलं आहे.
'उच्चायुक्तालय अवस्थी कुटुंबियांच्या संपर्कात असून या कठीण काळात त्यांना लागणारी सर्व मदत आम्ही करणार आहोत. आम्ही यासाठी स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहोत.' असंही सांगितलं आहे.