

लॉस एंजेलिस; वृत्तसंस्था : मूळ भारतीय अमेरिकन नेत्या आणि लॉस एंजेलिस सिटी कौन्सिल सदस्या नित्या रमन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण यश मिळवत जनरल निवडणुकीत स्थान मिळवले आहे. त्यांनी माजी रिॲलिटी टीव्ही स्टार स्पेन्सर प्रॅट यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले असून, आता नोव्हेंबरमध्ये विद्यमान महापौर केरेन बास यांच्याविरुद्ध त्यांची थेट लढत होणार आहे.
२०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकपूर्वी शहरातील रस्त्यांवर आणि तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहणाऱ्या बेघर नागरिकांची संख्या निम्म्यावर आणण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. हार्वर्ड आणि एमआयटी येथून शिक्षण घेतलेल्या रमन या शहर नियोजन तज्ज्ञ आहेत. २०२० मध्ये त्या लॉस एंजेलिस सिटी कौन्सिलवर निवडून जाणाऱ्या पहिल्या आशियाई-अमेरिकी महिला ठरल्या होत्या.
सॅन फर्नांडो व्हॅलीपासून सिल्व्हर लेकपर्यंत पसरलेल्या भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रमण यांनी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या काही तास आधीच आपली उमेदवारी जाहीर केली. आता त्या अशा उमेदवारांच्या यादीत सामील झाल्या आहेत, ज्यात माजी रिॲलिटी टेलिव्हिजन व्यक्तिमत्व स्पेन्सर प्रॅट, 'हाऊसिंग नाऊ कॅलिफोर्निया'च्या उपसंचालिका रे हुआंग, अनुभवी शहर अभियंता असाद अलनाज्जर आणि विद्यमान महापौर कॅरेन बास यांचा समावेश आहे.