पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडा (Canada) पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून भारतीय वंशाच्या अनिता आनंद (Anita Anand) बाहेर पडल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत एक निवेदनही जारी करुन आपली भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली. दरम्यान, परराष्ट्र मंत्री मेलानी जोली आणि अर्थमंत्री डोमिनिक लेब्लँक या दोन प्रमुख नेत्यांनीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यानंतर पंतप्रधानपद अनिता आनंद यांच्याकडे सोपवले जाईल, असे मानले जात होते. आता त्यांनीही माघार घेतल्याने लिबरल पक्षाच्या नेतृत्वाबाबत आणि पंतप्रधानपदाच्या चेहर्याबाबतची परिस्थिती गुंतागुंतीची होत चालली आहे.
अनिता आनंद यांचे वडील एस.व्ही. आनंद, तामिळनाडूचे स्वातंत्र्यसैनिक व्ही.ए. तो सुंदरमचे पुत्र होते. त्याची आई, सरोज राम, पंजाबच्या हाेत्या. ते दाेघेही डॉक्टर होते. त्यांनी कॅनडाला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. वित्त कायद्यातील तज्ज्ञ अनिता आनंद या टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक होत्या. २०१९ मध्ये ओंटारियोच्या ओकव्हिल येथून खासदार होण्यापूर्वी अमेरिकेतील येल विद्यापीठात व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून त्यांनी काम केले.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. आता यावर अनिता आनंद यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आता पंतप्रधानांनी त्यांचा पुढचा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मी असेही ठरवले आहे की, माझ्यासाठीही हीच योग्य वेळ आहे. मला आता माझ्या जुन्या व्यावसायिक जीवनात परत यायचे आहे. आता मला अध्यापन, संशोधन आणि सार्वजनिक धोरण विश्लेषणाशी संबंधित पुन्हा काम करायचे आहे.
माझ्या पहिल्या निवडणूक प्रचारादरम्यान, अनेक लोकांनी मला सांगितले की, भारतीय वंशाची महिला ओकव्हिल ओंटारियो मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही. तरीही ओकव्हिलने २०१९ पासून माझ्या पाठीशी उभे राहून मला निवडून दिले. हा एक सन्मान आहे जो मी नेहमीच माझ्या हृदयात जपून ठेवेन, असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
कॅनडाचे माजी पंतप्रधान ट्रुडोची जागा घेण्याची शर्यत आता रंजक बनली आहे. ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याच्या ऑफरच्या काही दिवसांतच अनिता आनंद यांनीही राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलानी जॉय आणि अर्थमंत्री डोमिनिक लेब्लँक यांनीही गेल्या आठवड्यात पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता लिबरल पक्षाचे नेतृत्व आणि पंतप्रधानपदाच्या चेहर्याबाबतची परिस्थिती गुंतागुंतीची होत चालली आहे.