न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : काश्मीर फार दूरची गोष्ट आहे, पाकिस्तानशी आम्हाला कोणत्याच विषयावर बोलायचे नाही. आता आम्ही केवळ आणि केवळ पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरबद्दल (व्याप्त काश्मीर) बोलू, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला खडसावले.
एस. जयशंकर संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या सत्रातील सहभागासाठी अमेरिकेत आहेत. न्यूयॉर्कमधील आपल्या तडाखेबाज भाषणाने जयशंकर यांनी अवघ्या जगासमोर संकटाच्या रूपात ठाकलेल्या आव्हानांवर भाष्य केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका दिवसापूर्वी युनोत केलेल्या भाषणातून काश्मीरचा मुद्दा उचलून धरला होता. त्याकडे अंगुलिनिर्देश करून जयशंकर म्हणाले, काश्मीरसंदर्भात भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकच मुद्दा उरलेला आहे आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त व्याप्त काश्मीर. हाच एक विषय आता आमच्या देशात आणि पाकिस्तानातील संबंधांमध्ये एकमेव कळीचा मुद्दा आहे. पाकिस्तानने काश्मीरच्या आमच्या भागावरील बेकायदा कब्जा खाली करणे हीच आमच्यातील द्विपक्षीय संबंधांची एकमेव अटही आता आहे, असे जयशंकर यांनी ठणकावून सांगितले.
पाकिस्तान हा इतरांच्या भूभागांवर डोळे ठेवणारा एक टुक्कार देश आहे. अशा देशांचे बुरखे इथे (युनोत) फाटले पाहिजेत, पण मी इथे याच व्यासपीठावर (युनोच्या) पाकिस्तानच्या उलट्या बोंबा ऐकल्या. पीओकेवरील ताबा भारताला द्यावा आणि दहशतवादाचे लाड पुरवणे बंद करावे, एवढेच मला पाकिस्तानला सांगायचे आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी यूएन सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस आणि यूएनजीए अध्यक्ष फिलेमोन यांगयांचीही भेट घेतली.