

वॉशिंग्टन : पुढील दोन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था चीनपेक्षा सुसाट वेगाने झेपावणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तविला आहे.
जागतिक बँकेच्या अहवालात म्हटल्यानुसार, पुढील दोन वित्तीय वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 6.7 टक्क्यांवर राहणार आहे. चीनचा विकास दर 4 ते 4.5 टक्क्यांच्या आतच राहणार आहे.
चालू आर्थिक वर्षापेक्षा एप्रीलपासून सुरू होणार्या आर्थिक वर्षात भारताच्या विकास दरात आणखी सुधारणा होणार आहे. चालू वर्षात भारतीय विकास दर 8.2 टक्के राहील, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. दुसर्या टप्प्यात मात्र हा विकास दर 6.5 राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी आहे. गेल्या वर्षी अमेरिकेचा विकास दर 2. 8 टक्के होता. चालू वर्षी हा दर 2.3 टक्के असून पुढील वर्षी हा दर 2 टक्के राहणार असल्याचा अंदाजही जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी कंपन्यांवर जबर कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापारी युद्ध भडकल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून व्यवसाय सुलभतेच्या द़ृष्टीने धोरणे आखली जात आहेत. उद्योगवृद्धीसाठी सेवा सवलती जाहीर केल्या जात असल्याने उद्योग क्षेत्रातील सकारात्मक घडामोडी सुरू आहे. सेवा क्षेत्रासह उत्पादन क्षेत्रामध्ये पुढील दोन वर्षांत मोठी उलाढाल होण्याची शक्यताही या अहवालात वर्तविण्यात आली आहे.