

तेहरान : इराण युद्धाच्या तणावादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताचे आणखी एक मालवाहू जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. गुजरातकडे येणारे ‘हाजी अली’ नावाचे हे जहाज 13 मे रोजी पहाटे ओमानच्या सागरी क्षेत्रातून जात होते. त्यावेळी त्याला ड्रोन किंवा क्षेपणास्त्रासारख्या एखाद्या शस्त्राने धडक दिली.
या अपघातानंतर जहाजाला भीषण आग लागली. ओमान कोस्ट गार्डने तत्परता दाखवत जहाजावरील सर्व 14 क्रू मेंबर्सची सुरक्षित सुटका केली आहे.
गुजरातच्या द्वारका येथील जहाजाचे मालक सुलतान अहमद अन्सार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हाजी अली’ हे जहाज बेरबेरा बंदराकडून शारजाहकडे जात होते. त्यावेळी पहाटे सुमारे 3.30 च्या सुमारास ओमानच्या किनारपट्टीजवळ हा अपघात झाला.
क्रू मेंबर्सच्या सांगण्यानुसार, जहाजावर एखादी स्फोटक वस्तू आदळल्याचा मोठा आवाज झाला आणि त्यानंतर आग लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सर्व 14 कर्मचाऱ्यांनी लाईफ बोटच्या मदतीने जहाजातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
याआधी 7 मे रोजीदेखील द्वारका येथीलच ‘फैज नूरे सुलेमानी’ हे मालवाहू जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना अमेरिका आणि इराणच्या नौदलांमधील गोळीबारांत त्याचे नुकसान झाले होते. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.