India-Uzbekistan Uranium Diplomacy : उझबेकिस्तान करणार दीर्घकालीन युरेनियमचा पुरवठा

पंतप्रधान नरेंद्र मोदी - उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्यात द्विपक्षीय चर्चा
India Uzbekistan uranium diplomacy
Published on
Updated on

ताश्कंद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्यात रविवारी झालेल्या चर्चेत भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करार निश्चित करण्यात आला. दोन्ही देशांमधील व्यापार सन २०३० पर्यंत ५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढचण्याचा निर्धार करण्यात आला.

ताश्कंद येथील 'कुक्सारॉय प्रेसिडेन्शियल पॅलेस'मध्ये उभय नेत्यांसह उच्चस्तरीय शिष्टमंडळ पातळीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही युरेनियम पुरवठ्यासाठी एक दीर्घकालीन व्यवस्था स्थापन करत आहोत. याशिवाय आज तीन ‘सिस्टर सिटी' आणि ‘सिस्टर स्टेट' सहकार्याला औपचारिक मान्यता दिली जात असून या क्षमतांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी एक निश्चित रोडमॅप तयार केला पाहिजे.

नगर विकास, आधुनिक पायाभूत सुविधांवर भर

द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी नगर विकास क्षेत्रातील सहकार्यावर विशेष भर दिला. उझबेकिस्तानमधील महत्त्वाकांक्षी ‘न्यू ताश्कंद’ प्रकल्प आणि गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ यांच्यातील तंत्रज्ञान व अनुभवांची देवाणघेवाण करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, उझबेकिस्तानमध्ये न्यू ताश्कंदसारखे भव्य प्रकल्प उभे राहात आहेत, तर भारतात आम्ही गुजरातमध्ये ‘गिफ्ट सिटी’ची निर्मिती केली आहे. या विकासातील सर्वोत्तम कार्यपद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी उझबेकिस्तानच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करण्यास आम्हाला आनंद होईल.

पंतप्रधान मोदी यांचे शनिवारी ताश्कंदमध्ये आगमन झाले होते, त्यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक आणि पारंपरिक स्वागत करण्यात आले. विमानतळापासून राष्ट्रपती भवनापर्यंत दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आणि त्यानंतर त्यांच्यात स्नेहभोजन पार पडले. या ऐतिहासिक भेटीमुळे भारत आणि उझबेकिस्तानमधील धोरणात्मक आणि ऊर्जा भागीदारी एका नव्या उंचीवर पोहोचली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्यात दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्याबाबत करार झाला.

  • दोन्ही देशांदरम्यान तीन ‘सिस्टर सिटी’ आणि ‘सिस्टर स्टेट’ सहकार्याला औपचारिक स्वरूप देण्यात आले.

  • ‘न्यू ताश्कंद’ व भारतातील ‘गिफ्ट सिटी’च्या माध्यमातून नगर विकास क्षेत्रात तंत्रज्ञान व अनुभव सामायिक करण्यावर भर देण्यात आला.

सर्वोच्च नागरी सन्मान आणि भव्य स्वागत

आपल्या चौथ्या उझबेकिस्तान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जाणारा ‘ऑर्डर ऑफ ओली दरजाली दोस्तलिक’ प्रदान करून गौरवण्यात आले. राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांनी हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन दिले.

logo
Pudhari News
pudhari.news