India US Trade Deal | भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

India US Trade Deal |
India US Trade Deal | भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतीक्षित द्विपक्षीय व्यापार करार (ट्रेड डील) आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, दोन्ही देशांमध्ये तत्त्वतः सहमती झाली आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ‘द इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम’ (WLF) दरम्यान बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, उभय देशांमधील व्यापारी कराराबाबत बहुतांश सर्व गोष्टींवर तत्त्वतः सहमती झाली असून केवळ कायदेशीर तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी आहे.

कायदेशीर भाषेच्या पुनर्रचनेचे काम सुरू

या कराराच्या प्रगतीबाबत बोलताना राजदूत गोर म्हणाले, अमेरिका सध्या या करारातील काही मजकुराची फेररचना (रीकॉन्फिगर) करत आहे. तत्त्वतः व्यापार कराराची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. कराराला अंतिम रूप देण्यासाठी लागणारा वेळ हा केवळ कायदेशीर तांत्रिक भाषेची जुळवाजुळव करण्यासाठी लागत आहे. भारत आणि अमेरिकेचे मजबूत संबंध आगामी काळात जागतिक पटलावर नवी दिशा ठरवतील.

रशियन तेलावरील १०० टक्के टॅरिफ विधेयकावर स्पष्टीकरण

अमेरिकन संसदेने रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याबाबत मांडलेल्या विधेयकावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. हे विधेयक अमेरिकी संसद दोन्ही पक्षांच्या (डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन) पाठिंब्याने पुढे नेत आहे. याचा थेट संबंध राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाशी जोडू नये, असे सांगत त्यांनी संसद आणि व्हाईट हाऊसच्या भूमिकेतील फरक स्पष्ट केला.

या विधेयकाचा भारतावर परिणाम होत असल्याचे मान्य करताना ते म्हणाले, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्या दिवसापासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी कटिबद्ध आहेत. अमेरिकन सिनेटने हे टॅरिफ विधेयक मोठ्या बहुमताने मंजूर केले आहे. कारण, हे युद्ध थांबणे अत्यंत गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news