

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रलंबित व्यापार अडथळे दूर करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. फेब्रुवारीमध्ये घोषित झालेल्या द्विपक्षीय व्यापार कराराला त्यातून अंतिम रूप देण्यात येईल, अशी प्रबळ आशा व्यापारात वाढलेल्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्यक्त केली.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले की, भारत आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका आपल्या व्यापार अडथळ्यांवर लक्ष देण्यासाठी वाटाघाटी सुरू ठेवत आहेत, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. ते पुढे म्हणाले, मी माझा खूप चांगला मित्र, पंतप्रधान मोदी यांच्याशी येत्या काही आठवड्यांत बोलण्यास उत्सुक आहे. मला खात्री आहे की, आपल्या दोन्ही महान देशांसाठी यशस्वी निष्कर्ष काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही!
ट्रम्प यांच्या या घोषणेने त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेमध्ये लक्षणीय बदल दिसून येतो. याआधी त्यांनी भारताला व्यापार संबंधांमध्ये ‘पूर्णपणे एकतर्फी आपत्ती’ असे म्हटले होते. विशेषत:, ऑगस्टच्या उत्तरार्धात भारतीय निर्यातीवर 50 टक्के शुल्क (टॅरिफ) लावल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. यात 1 ऑगस्टपासून व्यापार असंतुलनासाठी 25 टक्के आणि भारताने रशियन तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त 25 टक्के दंडात्मक शुल्क समाविष्ट होते. या शुल्कांमुळे भारताच्या अमेरिकेशी असलेल्या 86.5 अब्ज डॉलरच्या एकूण मालाच्या निर्यातीपैकी जवळपास 50 टक्के निर्यात धोक्यात आली होती. केवळ ट्रम्पच नव्हे, तर त्यांचे व्यापार सल्लागार पीटर नॅवरो आणि वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनीही भारताच्या रशियन तेल खरेदी आणि ‘महाराजा टॅरिफ’ लादण्यावर टीका केली होती.